इन्फोसिसचे अमेरिकेत स्थानिकांना प्राधान्य
By admin | Published: April 19, 2017 02:13 AM2017-04-19T02:13:43+5:302017-04-19T02:13:43+5:30
अमेरिकेने व्यावसायिक व्हिसावर बंधने घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी इन्फोसिसने अमेरिकेत स्थानिक नागरिकांना अधिकाधिक नोकऱ्या
नवी दिल्ली : अमेरिकेने व्यावसायिक व्हिसावर बंधने घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी इन्फोसिसने अमेरिकेत स्थानिक नागरिकांना अधिकाधिक नोकऱ्या देण्याचे धोरण आखले आहे. अमेरिकेत विकास आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचारही कंपनीने चालविला आहे.
विदेशातील बाजारात स्थानिक नागरिकांना काम देणे ही आयटी कंपन्यांसाठी महागडी बाब ठरते. तरीही इन्फोसिसमध्ये स्थानिक आणि विदेशी कर्मचारी यांची आधीपासूनच योग्य सांगड घालण्यात येत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एच-१बी व्हिसावर बंधने आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयटी कंपन्यांना आपल्या धोरणात बदल करावा लागत आहे.
इन्फोसिसचे मुख्य परिचालन अधिकारी यू. बी. प्रवीण राव यांनी आपल्या गुंतवणूकदारांसोबत कॉन्फरन्स कॉलद्वारे नुकतीच चर्चा केली. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की, व्हिसाशी संबंधित प्रश्नावर गेल्या २४ महिन्यांपासून बारकाईने नजर ठेवून आहोत. अमेरिकेतील प्रकल्पांत स्थानिक नागरिकांची संख्या वाढवित आहोत. व्यवसायावर परिणाम करील, अशी कोणतीही अनुचित बाब सध्या तरी आढळलेली नाही. या वर्षात स्थानिकांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवू. (लोकमत न्यूज नेटवर्क)