इन्फोसिसने ९ हजार कर्मचाऱ्यांना काढले
By admin | Published: January 21, 2017 05:18 AM2017-01-21T05:18:30+5:302017-01-21T05:18:30+5:30
इन्फोसिसने गेल्या वर्षभरात ८ हजार ते ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
बंगळुरू : इन्फोसिसने गेल्या वर्षभरात ८ हजार ते ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. स्वयंचलित यांत्रिकीकरणामुळे कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, अशी माहिती कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख कृष्णमूर्ती शंकर यांनी दिली आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलेल्या ग्लोबल शेपर्सच्या वतीने बंगळूरमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शंकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक तिमाहीत सुमारे २ हजार लोकांना कामावरून काढत आहोत.
इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी आहे. इन्फोसिप्रमाणेच अन्य सर्व आयटी कंपन्या स्वयंचलित
तंत्रज्ञानावर भर देत आहेत.
बीपीओ, अॅप्लिकेशन मॅनेजमेंट
आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या आपल्या पारंपरिक क्षेत्रात कंपन्या स्वयंचलित तंत्रज्ञान आणत आहेत. त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसत आहे. विप्रोकडे होल्मेस नावाचा स्वयंचलितीकरण प्लॅटफॉर्म आहे.
फिलिप्समधून इन्फोसिसमध्ये २0१५मध्ये दाखल झालेल्या कृष्णमूर्ती शंकर यांनी सांगितले की, यांत्रिकीकरणाची गती जसजशी वाढत जाईल, तसतशी कंपनीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत जाईल. वास्तविक कर्मचाऱ्यांची संख्या आताच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सगळीच कर्मचारी कपात यांत्रिकीकरणामुळे झालेली नाही. कंपनीची वित्तीय स्थिती वाईट असल्याचा परिणामही काही प्रमाणात झाला आहे.
चालू वित्त वर्षाच्या पहिल्या
नऊ महिन्यांत आम्ही ५,७00
लोकांची नव्याने भरती केली.
गेल्या वर्षी याच काळात १७ हजार लोकांची भरती करण्यात आली
होती. डिसेंबरच्या तिमाहीत
कंपनीच्या कर्मचारी संख्येत मोठी घट झाली आहे. (वृत्तसंस्था)
>3200 लोकांना विप्रोने नोव्हेंबरमध्ये कामावरून काढले, असे कंपनीचे जागतिक मनुष्य बळ प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले. 4500 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे कंपनीचे यंदाच्या वित्त वर्षात लक्ष्य आहे. कर्मचारी कपातीमुळे आपल्या नफ्यात सुधारणा करणे कंपन्यांना शक्य होत आहे.