...तर अॅम्बी व्हॅलीचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 03:59 AM2017-07-26T03:59:33+5:302017-07-26T03:59:50+5:30
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांनी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत १,५०० कोटी ‘सेबी’कडे जमा न केल्यास सहाराच्या पुणे जिल्ह्यातील अॅम्बी व्हॅलीचा प्रत्यक्ष लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
हा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’मार्फत केला जाणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध करायच्या लिलावाच्या नोटिशीचा मसुदा न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने मंजूर केला. ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ने लिलावाची नोटीस १४ आॅगस्ट
रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध
करून इच्छुकांकडून बोली
मागाव्यात. त्यापुढील कारवाई,
राय दिलेल्या मुदतीत १,५०० कोटी रुपये भरतात की नाही हे
पाहून ठरविली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने आदेश देऊनही गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल सुब्रतो राय गेली दोन वर्षे तुरुंगात आहेत. जामिनासाठी १० हजार कोटी भरण्याचा आदेश झाला. पण त्यांनी तेही भरले नाहीत. मध्यंतरी आईच्या निधनानंतर काही काळ त्यांना पॅरॉलवर सोडण्यात आले होते.