मतदानयंत्रांच्या विरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:19 AM2018-01-03T01:19:15+5:302018-01-03T01:20:17+5:30
कर्नाटकसह काही राज्यांच्या विधानसभा तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) कोणतीही जोखीम घेण्यास काँग्रेस तयार नसून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर हा मुद्दा बाहेर काढण्याची तयारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - कर्नाटकसह काही राज्यांच्या विधानसभा तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) कोणतीही जोखीम घेण्यास काँग्रेस तयार नसून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर हा मुद्दा बाहेर काढण्याची तयारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
हिमाचल व गुजरातमधील पराभव स्वीकारून या मुद्द्यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसले, तरी या मुद्द्यावर गैरभाजपा पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.
मतदानयंत्रांबाबत उपस्थित केल्या जात असलेल्या शंकांच्या स्थितीत निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी कोणता मार्ग अवलंबिला जावा, यावरही विरोधी पक्षांच्या बैठकीत विचारविनिमय होणार आहे. गुजरातेत ईव्हीएममधील हेराफेरीमुळेच काँग्रेस पराभूत झाली आणि भाजपाने पुन्हा सत्ता मिळवली, याचे पुरावे मिळत असल्यामुळे काँग्रेसचे नेते या निर्णयापर्यंत आले आहेत.
ईव्हीएमच्या विरोधात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह इतर अनेक पक्षांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. निवडणूक आयोग व भाजपाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता काँग्रेसने हा मुद्दा हाती घेऊन तो तडीस नेण्याची तयारी सुरू केली आहे.
जगभरातील तज्ज्ञांशी काँग्रेस करतेय संपर्क
ईव्हीएमबाबतच्या चर्चेला मूर्त स्वरूप देण्यासाठी ५ जानेवारीला विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध पक्षांशी प्राथमिक चर्चा केलेली आहे. आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे घेण्यात याव्यात, यासाठी या बैठकीत कायदेशीर व राजकीय लढाईची रणनीती तयार करण्यात येईल. ईव्हीएम हॅक करून दुरुपयोग सिद्ध करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांशीही काँग्रेस संपर्क साधण्याच्या तयारीत आहे, असे संकेत मिळत आहेत.