भारतीय जवानांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये गुन्हा दाखल
By admin | Published: April 17, 2017 08:51 AM2017-04-17T08:51:41+5:302017-04-17T08:57:42+5:30
श्रीनगरमधील बटमालू परिसरात बीएसएफच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बीएसएफ जवानांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - जम्मू काश्मीर पोलिसांनी भारतीय जवानांविरोधात खटला दाखल केला आहे. श्रीनगरमधील बटमालू परिसरात बीएसएफच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बीएसएफ जवानांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेसाठी बीएसएफ जवानांना जबाबदार ठरवत कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. शनिवारी बटमालू येथे दगडफेक करणा-या एका समूहाविरोधात बीएसएफच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याची माहिती आहे. या गोळीबारादरम्यान बारामुला जिल्ह्यातील 23 वर्षीय सज्जाद हुसैन शेखचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बीएसएफच्या 38 बटालियनचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र बाघडे यांनी जम्मू काश्मीर पोलिसांना घटनेसंबंधीचा अहवाल सुपुर्द केला आहे. बीएसएफ मुख्यालयाकडे जाणा-या बीएसएफच्या तीन गाड्यांवर काही जणांनी दगडफेक केली. शिवाय जवानांच्या रायफलही लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला.
युवकाच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटमालू परिसरातील स्थानिकांना लाल चौक, बटमालू आणि पुलवामामधील सर्व दुकानं बंद ठेवली होती. याशिवाय, सार्वजनिक वाहतूक मार्गही बंद केली होती. गेल्या शनिवार बीएसएफच्या गोळीबार युवकाच्या झालेल्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स आणि फुटीरतावादी संघटनांनी बंदचं आव्हान केले होते.