पोलीस लाठीमारात जखमी विद्यार्थ्याने मागितली भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 04:03 AM2020-02-18T04:03:11+5:302020-02-18T04:03:40+5:30
‘जामिया’ प्रकरणी याचिका : केंद्र, आप, पोलिसांना उत्तर मागितले
नवी दिल्ली : जामिया-मिलिया-इस्लामिया विद्यापीठात सीएएच्या मुद्यावर झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याने भरपाईसाठी याचिका दाखल केली आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार, आप सरकार आणि पोलिसांना उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने विद्यार्थ्याच्या याचिकेवर केंद्र सरकार व इतरांकडून उत्तर मागविले आहे. या याचिकेत शायान मुजीब या विद्यार्थ्याने आरोप केला आहे की, पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ज्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली तेव्हा आपण ग्रंथालयात वाचन करीत होतो.
शायान मुजीब याने अॅड. नबीला हसन यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की, जखमी झाल्यानंतर उपचारासाठी आतापर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. अन्य एक विद्यार्थी मोहम्मद मिन्हाजुद्दीन याने याचिका केली असून, उपचारासाठी आलेल्या खर्चाची रक्कम देण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
च्१५ डिसेंबर रोजी जामियाजवळ सीएएविरोधात आंदोलन हिंसक झाले होते. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती, तसेच सरकारी बस आणि खासगी वाहनांना आग लावली होती. त्यानंतर पोलीस जामिया परिसरात घुसले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. या कारवाईत याचिकाकर्त्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले होते.