पिस्तुलाचा चाप ओढल्याने आई जखमी, शेतात सापडलेल्या शस्त्राचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:09 AM2018-06-19T04:09:04+5:302018-06-19T04:09:04+5:30
सापडलेले पिस्तुल खेळण्यातील आहे, असे समजून आईने आपल्या मुलीला आणून दिले. मुलीनेही खेळणे म्हणून त्याचा चाप ओढला. पण पिस्तुलातून उडालेली गोळी आईला लागली आणि जखमी झाली. तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोलकाता : सापडलेले पिस्तुल खेळण्यातील आहे, असे समजून आईने आपल्या मुलीला आणून दिले. मुलीनेही खेळणे म्हणून त्याचा चाप ओढला. पण पिस्तुलातून उडालेली गोळी आईला लागली आणि जखमी झाली. तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ककोली नावाची महिला शेतात काम करीत असताना, तिला तिथे पिस्तुल पडल्याचे दिसले. ते खरे पिस्तुल असेल, असे तिला अजिबातच वाटले नाही. कोणा तरी लहान मुलाचे ते असेल आणि तो ते इथे विसरून गेला असेल, असा तिचा अंदाज होता. आपल्या मुलीला हे खेळणे नक्कीच आवडेल, म्हणून तिने ते मुलीला दिले. ते पाहून मुलगीही भलतीच खूश झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मुलगीही पार घाबरून गेली असून, पोलीस तिच्याकडे विचारणा करीत असल्याने ती भलतीच घाबरलीही आहे. ती पिस्तुल खरेच शेतात पडलेली होती की आणखी कुठे याचीही चौकशी पोलीस करीत आहेत. (वृत्तसंस्था)
>पतीची होणार पोलीस चौकशी
त्या महिलेच्या पतीचीही चौकशी सुरू आहे. तिच्या पतीने पिस्तूल आणली असेल आणि तो घरात ठेवून गेला असेल. आईला ते खेळणे वाटल्याने तिने मुलीला दिली असेल, अशी शंका पोलीस व्यक्त करीत आहेत. पतीला पोलिसांनी अटक करू नये, म्हणून पिस्तूल शेतात सापडल्याचे ती सांगत असावी, असाही पोलिसांचा अंदाज आहे. ती महिला सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलीस पतीवरच प्रश्नांचा भडिमार करीत आहेत.