आश्रमशाळेत मुलींवर अनन्वित अत्याचार; महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:58 AM2018-12-30T00:58:04+5:302018-12-30T00:58:23+5:30
राजधानी दिल्लीच्या द्वारका भागातील एका आश्रमशाळेत मुलींवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तेथील कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या द्वारका भागातील एका आश्रमशाळेत मुलींवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तेथील कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगाने केलेल्या तपासणीत मुलींवर अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
महिला आयोगाच्या सदस्यांनी गुरुवारी या आश्रमशाळेची पाहणी केली आणि तेथील मुलींशी संवाद साधला, तेव्हा अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली. तेथील महिला कर्मचाºयांनी शिक्षा म्हणून मुलींना जबरदस्तीने तिखट पूड खायला घातली आणि काही मुलींच्या गुप्तांगामध्येही तिखट पूड घातल्याच्या तक्रारी आयोगाच्या सदस्यांपुढे करण्यात आल्या. आश्रमशाळेत ५ ते १५ वयोगटाच्या मुली राहतात.
आश्रमशाळेतील लहान मुलींनाही शिक्षा म्हणून कपडे व भांडी धुण्यास सांगण्यात येत होते, तसेच सर्व खोल्या तसेच शौचालये स्वच्छ करण्याचे कामही त्यांच्याकडून करून घेण्यात येत असे. तेथील स्वयंपाकघरात एकच खानसामा असून, तो २२ जणींसाठी स्वयंपाक करीत असे. त्याच्या मदतीलाही या मुलींना पाठविण्यात येत असे. तेथील जेवणाचा दर्जाही अतिशय वाईट असल्याच्या तक्रारी मुलींनी केल्या.
सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त
मुलींच्या तक्रारी ऐकून स्वाती मालीवाल यांनी त्या भागातील पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर लगेचच पोलीस पथक तिथे आले आणि त्यांनी मुलींचे जबाब नोंदवून घेतले. त्याआधारे महिला कर्मचाºयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलींच्या सुरक्षेसाठी तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.