खडसेंच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करणार चौकशी सुरु : यापुर्वीही दोन वेळा झाला होता प्रकार
By admin | Published: February 17, 2016 12:24 AM2016-02-17T00:24:19+5:302016-02-17T00:29:07+5:30
जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे.
जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे. भाजप पदाधिकार्यांनी दिलेल्या सुनील पाटील व आनंद पाटील यांच्या नावाबाबतचा फेसबुकवरील आय.पी.ॲड्रेसची चौकशी केली जात आहे, तो ॲड्रेस निष्पन्न झाल्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी दिली.
खडसे यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह मजकुराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपच्या पदाधिकार्यांनी संताप व्यक्त केला होता. आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदन देण्यात आले होते. त्यातील सुनील पाटील हा मुक्ताईनगर येथील तर आनंद पाटील हा मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांची नावे आम्ही पोलिसांनी दिली आहेत असे आमदार भोळे यांनी सांगितले.
यापुर्वीही दोन वेळा झाला होता प्रकार
खडसे यांच्याविषयी सोशय मिडियावर आक्षेपार्ह मजकुर अपलोड करण्याची ही तिसरी वेळ आहे. चार महिन्यापूर्वीही त्यांच्या आजारपणाविषयी तसेच बदनामीकारक पोस्ट व्हायरल झाली होती. तर त्याआधी देखील त्यांच्या कार्यक्षमतेविषयी व मुख्यमंत्री पदाबाबत फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आली होती. दोन्ही वेळा भाजपच्या पदाधिकार्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. एका प्रकरणात अमळनेर, रावेर व भुसावळ येथील महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग आढळून आला होता. तेव्हा त्यांच्या पालकांनी खडसे यांची भेट घेवून माफी मागितल्याने वाद मिटला होता, असे भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सांगितले.
कोट..
या प्रकरणाचा तपास आमच्याकडेच आहे. भाजप पदाधिकार्यांनी दिलेल्या नावाबाबत आय.पी.ॲड्रेसची माहिती काढली जात आहे. ते निष्पन्न झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
-राजेशसिंह चंदेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा)
कोट..
बदनामी करणार्याची नावे आम्ही पोलिसांना दिली आहेत. आमच्या माहितीनुसार त्यातील एक जण मुक्ताईनगर येथील तर दुसरा जळगावच्या मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
-सुरेश भोळे, आमदार