उत्कल एक्स्प्रेस अपघाताची चौकशी सुरू, प्रभूंचाही रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 04:58 PM2017-08-20T16:58:39+5:302017-08-20T16:58:48+5:30
उत्कल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेश, दि. 20 - उत्कल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या भीषण अपघातामुळे 23 जणांचा मृत्यू झाला असून, 97हून अधिक लोक जखमी झालेत. त्यामुळे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूसुद्धा खडबडून जागे झाले आहेत. विरोधकांनी सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे या घटनेची तात्काळ दखल घेत सुरेश प्रभूंनी रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिलाय. अपघाताबाबतचा सविस्तर अहवाल संध्याकाळपर्यंत कळवा, तसेच अहवालात अपघाताला जबाबदार असलेल्या दोषींचीही नावे द्या, असे आदेश सुरेश प्रभूंनी दिले आहेत. उत्कल एक्स्प्रेसच्या भीषण अपघात प्रकरणात भारतीय कलम 304अ अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून 23 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 97 हून अधिक जखमी झाले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले की, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत. रेल्वे मंत्रालय सातत्याने उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले की, बचावकार्याला प्राधान्य देत आहोत. अडकून पडलेल्यांना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. घटनास्थळी विजेची व्यवस्था केली आहे. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी अपघाताबद्दल रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येतील.