एनआयटी प्रकरणी चौकशीचे आदेश

By admin | Published: April 8, 2016 03:04 AM2016-04-08T03:04:57+5:302016-04-08T03:04:57+5:30

गेल्या आठवड्यात वर्ल्ड टी-२० चषक क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर श्रीनगर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) विद्यार्थ्यांच्या दोन

Inquiry order in NIT case | एनआयटी प्रकरणी चौकशीचे आदेश

एनआयटी प्रकरणी चौकशीचे आदेश

Next

श्रीनगर/नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात वर्ल्ड टी-२० चषक क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर श्रीनगर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या संघर्षाची कालबद्ध चौकशी करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारने गुरुवारी दिले. चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी दिली. श्रीनगरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी चौकशी करून,१५ दिवसांत अहवाल सादर करतील.
एफआयआर दाखल
तेथील हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांनी गुरुवारी दोन एफआयआर दाखल केले. १ एप्रिलला काश्मिरी आणि बिगर-काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या संघर्षाच्या संदर्भात अज्ञात लोकांविरुद्ध पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुसरा एफआयआर ५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी केलेल्या तोडफोडीच्या संदर्भात आहे. दोन्ही एफआयआरमध्ये कुणाचेही नाव नाही.
जम्मूत बंद
श्रीनगरच्या एनआयटी येथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जम्मूमध्ये उस्फूर्त बंद पाळण्यात आला. जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी आणि अन्य संघटनांनी आयोजित केलेल्या या बंदमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. वकिलांनीही निदर्शने करून लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
एनआयटी अन्यत्र हलवा
एनआयटी काश्मिरातून अन्यत्र हलवा आणि विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा या मागणीसाठी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या दिवशीही तीव्र निदर्शने केली. (वृत्तसंस्था)
>परीक्षेची मुभा
श्रीनगरच्या एनआयटीतील विद्यार्थ्यांना नंतर परीक्षेला बसण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
मंत्रालयाच्या तीन सदस्यीय पथकाने परिस्थितीची पाहणी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
जे विद्यार्थी पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेला बसू इच्छितात त्यांना त्या परीक्षेत बसता येईल. परंतु जे विद्यार्थी आताच्या परीक्षेला बसण्यास इच्छुक नाहीत त्यांच्यासाठी नव्याने परीक्षा घेण्यात येतील.
> राहुल यांची टीका
पीडीपी-भाजपाचे सरकार एनआयटीतील विद्यार्थ्यांविरुद्ध ‘निर्दयी’ बळाचा वापर करीत आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मी निषेध करतो, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Web Title: Inquiry order in NIT case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.