आवाज नाही, फक्त काम; आयएनएस खांदेरी शत्रूवर भारी पडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 08:59 AM2019-09-28T08:59:46+5:302019-09-28T09:01:18+5:30

भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी आजपासून दाखल होणार आहे.

ins khanderi submarine is to be commissioned in indian navy today | आवाज नाही, फक्त काम; आयएनएस खांदेरी शत्रूवर भारी पडणार!

आवाज नाही, फक्त काम; आयएनएस खांदेरी शत्रूवर भारी पडणार!

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी आजपासून दाखल होणार नौदलाच्या ताफ्यात पाणीबुडींची संख्या व एकूण क्षमता वाढणार आहे. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती दुसऱ्या जहाजांच्या रडारला दिसत नाही

मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी आजपासून दाखल होणार आहे. त्यामुळे नौदलाच्या ताफ्यात पाणीबुडींची संख्या व एकूण क्षमता वाढणार आहे. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती दुसऱ्या जहाजांच्या रडारला दिसत नाही; त्यामुळे युद्धकाळात त्याचा मोठा लाभ भारताला होऊ शकतो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पाणीबुडीचं लोकार्पण होणार असून, पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येईल.

स्कॉर्पिन श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी आहे. यापूर्वी कलवरी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती. या पाणबुडीमध्ये शत्रूवर थेट हल्ला करण्याची क्षमता आहे. ही अत्याधुनिक सुविधांनी युक्त कन्व्हेन्शनल डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी असून, पाण्यात आवाजाच्या तरंगावरून पाणबुडीचा शोध घेतला जातो; मात्र या पाणबुडीचा आवाज येत नसल्याने रडारवर ही पाणबुडी दिसत नाही. या पाणबुडीत शत्रूवर थेट हल्ला करण्याची तसेच कोणत्याही स्थितीत कार्यरत राहण्याची क्षमता आहे. या पाणबुडीचा वेग प्रति तास 20 नॉटिकल मैल आहे. पाणीबुडीचा एका तासात कमाल वेग 35 ते 40 किमी आहे. ती सलग 45 दिवस पाण्यात राहू शकते. यावर 37 नौसैनिक तैनात असून, पाण्यात 300 मीटर खोल जाण्याची तिची क्षमता आहे. 67 मीटर लांब, 6.2 मीटर रुंद व 12.3 मीटर उंच या पाणबुडीचे वजन 1,550 टन आहे. कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आहे. या पाणबुडीमुळे 300 किमी अंतरापर्यंतच्या परिसरावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. रडार, सोनार, इंजिन व इतर 1 हजार लहान-मोठी उपकरणे यात देण्यात आलेली आहेत. समुद्रात गेल्यावर 12 हजार किमीपर्यंतचं अंतर पार करण्याची हिची क्षमता आहे.  पाण्याखालील युद्धामध्ये पाणबुडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कोणतेही नौदल, कोणत्याही बंदरावर हल्ला करू शकत नाही, पाणबुडी पाण्याखाली नेमक्या कोणत्या भागात आहे ही माहिती नसल्याने विरोधक शत्रूंची अडचण होते व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती चांगली बाब असते.


अरबी समुद्रातील सुरक्षेसाठी या पाणबुडीवर अवलंबून राहता येणे शक्य होणार आहे. एकदा पाण्यात गेल्यानंतर एक महिनाभर ही पाणबुडी पाण्यात राहून आपले काम करू शकेल. या पाणबुडीवर सुमारे 50 जणांचा ताफा कार्यरत राहू शकतो. या पाणबुडीत कार्यरत असलेल्या जवान, अधिकाऱ्यांचा शिधा संपल्यावर त्यांना परत मागे किनाऱ्याकडे यावे लागते. अन्यथा आणखी काही काळदेखील ही पाणबुडी समुद्रात पाण्याखाली राहून सक्षमपणे काम करू शकते.

या प्रकारच्या पाणबुड्यांमध्ये ऊर्जेसाठी बॅटऱ्या लावलेल्या असतात. सुमारे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांनंतर या पाणबुडीतून पाइप बाहेर काढून त्याद्वारे ऑक्सिजन आत घेऊन बॅटऱ्या चार्ज केल्या जातात. शक्यतो ही कार्यवाही रात्रीच्या वेळी गडद अंधारात केली जाते. कोणालाही पाणबुडी नेमकी कुठे आहे हे कळू नये यासाठी ही काळजी घेतली जाते. तर दिवसाउजेडी ही पाणबुडी खोल पाण्यामध्ये असते. 200 ते 300 मीटर पाण्याखाली जाऊन कार्यरत राहण्याची क्षमता या पाणबुडीची आहे. अत्यंत सक्षम अशा या पाणबुडीचे चांगले डिझाइन तयार करण्यात आले आहे.

Web Title: ins khanderi submarine is to be commissioned in indian navy today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.