काश्मीरच्या समस्येवर ‘इन्सानियत’चा तोडगा!

By admin | Published: August 10, 2016 04:59 AM2016-08-10T04:59:02+5:302016-08-10T04:59:02+5:30

हिंसाचाराने धगधगत असलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर तब्बल महिनाभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित

'Insanity' solution to Kashmir problem! | काश्मीरच्या समस्येवर ‘इन्सानियत’चा तोडगा!

काश्मीरच्या समस्येवर ‘इन्सानियत’चा तोडगा!

Next

भाबरा (मध्य प्रदेश) : हिंसाचाराने धगधगत असलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर तब्बल महिनाभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इन्सानियत, जम्हुरियत आणि काश्मिरियत (मानवता, लोकशाही आणि काश्मीर) ही भावना जपत लोकशाही आणि वाटाघाटीचा मार्ग अनुसरण्याचे आवाहन केले. शांतता, एकता आणि सद्भावना जपत सर्व मिळून काश्मीरला धरतीवरील नंदनवनच ठेवू या, अशी सादही त्यांनी काश्मिरी तरुणांना घातली. तमाम भारतीय अनुभवत असलेले स्वातंत्र्य काश्मीरलाही आहे. निरपराध तरुणांच्या हाती लॅपटॉप, पुस्तके आणि क्रिकेटच्या बॅटऐवजी दगडधोंडे पाहून दु:ख होते, असे सांगत त्यांनी तरुणांना धरतीवरील या नंदनवनात शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले.
स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी (भाबरा) ‘स्वातंत्र्यांची ‘७० साल आझादी... जरा याद करो कुर्बानी..’ या देशभक्ती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित जाहीर सभेत त्यांनी काश्मीरमधील

स्थितीचा उल्लेख करीत काश्मिरी जनतेला शांतता हवी आहे. तरुणांच्या हाती दगडधोंडे नव्हेंतर लॅपटॉप, पुस्तके असावीत. आम्हाला काश्मीरचा विकास हवा आहे. जम्मू-काश्मिरमधील प्रत्येकाचे भविष्य तमाम भारतीयांप्रमाणे उज्वल व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे स्पष्ट करीत काश्मिरला हवी ती मदत देण्याची केंद्राची तयारी असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आज आॅगस्ट क्रांती दिन आहे. महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’चा नारा देत इंग्रजांना गाशा गुंडाळण्याचा इशारा दिला होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण करणारे हुत्मामे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्व भारतीयांनी आज निर्धार करावा. त्यांनी भारतासाठी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी तसेच वंचित, पीडित, शोषितांचे जीवनमान सुखदायी करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे.
पंतप्रधान गुजरातीतही बोलले...
गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्हा आहे. याच जिल्ह्यातील भाबरा गावी आदिवासी समुदायापुढे बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात गुजराती भाषेतून करताच टाळ्यांचा वर्षाव झाला. या पवित्र भूमीत येऊन मी धन्य झालो. ही वीरांची भूमी आहे. येथील संस्कृतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. संत सिंगाजी यांचा आर्शिवाद या भूमीला लाभला आहे. स्वांतत्र्यांच्या लढ्यात येथील भूमीपूत्रांनीही मोठे योगदान दिले आहे, असे मोदी गुजराती भाषेतून बोलले.


द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव असताना भारताने पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून सीमापार दहशतवादाला पाककडून दिले जाणारे प्रोत्साहन व काश्मीरमधील असंतोषाला पाककडून सातत्याने दिली जाणारी चिथावणी याबद्दल त्यांना कडक शब्दांत समज दिली.


आतापर्यंत दोन पोलिसांसह ५५ ठार
८ जुलै रोजी हिज्बुल मुजाहिदीनचा बुऱ्हाण वनी सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाल्यानंतर जम्मू-काश्मीर धुमसत आहे. आतापर्यंत घडलेल्या हिंसक घटनांत दोन पोलिसांसह ५५ जण ठार झाले आहेत.
सोमवारी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन काश्मीरमधील स्थितीवर चर्चा केली होती.
तसेच पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री राजनाथ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.

स्वातंत्र्य सेनानींनी जे स्वातंत्र्य हिंदुस्थानला दिले, तेच स्वातंत्र्य काश्मीरलाही मिळाले आहे. परंतु, काही मूठभर लोक काश्मीरच्या महान परंपेरला तडा देत आहेत. मानवता आणि काश्मिरी परंपरा न डागाळता धरतीवरील हे नंदनवन जपू या! देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनो पुढे या. विकासाच्या मार्गाने समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो, असे सांगत त्यांनी काश्मीरच्या विकासासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले.

देशभक्तीच्या भावनेतून काम करा- शिवराज सिंह
क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावाला भेट देणारे मोदी हे भारताचे पंतप्रधान होय. ...जरा याद कुर्बानी...या देशभक्तीपर जागृती अभियानातहत ९ ते २३ आॅगस्टपर्यंत देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आणार आहेत. केंद्र सरकारचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. भारतीय स्वातंत्र्यांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्यां वीरांचे स्मरण करत त्यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी तसेच स्वच्छता आणि डिजिटल इंडिया या योजना सफल करण्यासाठी युवकांनी पुढे येत देशभक्तीच्या भावनेतून झटले पाहिजे, असे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी केले.

Web Title: 'Insanity' solution to Kashmir problem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.