रेल्वेच्या जेवणात किडे, झुरळे! कॅटरिंग सेवेविरोधात प्रवाशांच्या ६,९४८ तक्रारी, ५०० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 02:33 PM2024-08-17T14:33:05+5:302024-08-17T14:34:05+5:30
माहिती अधिकाराच्या अर्जावर दिलेल्या उत्तरात ‘आयआरसीटीसी’ने विविध माहिती दिली
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग सेवेविरोधातील म्हणजेच रेल्वेत पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या विरोधातील तक्रारींत मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ५०० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती भारतीय रेल्वे कॅटरिंग व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) दिली आहे. रेल्वेतील जेवणात माश्या, किडे, धुळ, उंदीर आणि झुरळे आढळून असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
माहिती अधिकाराच्या अर्जावर दिलेल्या उत्तरात ‘आयआरसीटीसी’ने ही माहिती दिली आहे. या कालावधीत वंदे भारत, राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि मेल एक्स्प्रेस यांसारख्या आलिशान गाड्यांतील जेवणाबाबतही लोकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
- वर्षभरात कमालीची वाढ
रेल्वेतील अन्नाबाबतच्या प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींची संख्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वाढून ६,९४८ झाली. मार्च २०२२ च्या अखेरीस ती अवघी १,१९२ इतकी होती. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२४ या काळात मिळालेल्या एकूण तक्रारींची संख्या ११,८५० इतकी होती.
६८ आस्थापनांना कारणे दाखवा
- आयआरसीटीसी’ने म्हटले की, ‘आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना ६८ कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जानेवारी २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत ३ कॅटरिंग कंत्राटे रद्द करण्यात आली.’
- वास्तविक एका वृत्तानुसार, ‘आयआरसीटीसी’कडे १,५१८ कॅटरिंग करार होते. त्यापैकी फक्त ३ करार रद्द झाले आहेत. २०१७ मध्ये नियंत्रक व महालेखापाल (कॅग) यांच्या ऑडिट अहवालात धक्कादायक माहिती समोर आली.
- रेल्वेतील जेवणात माश्या, किडे, धूळ, उंदीर आणि झुरळे आढळून आली.