कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:27 AM2018-08-21T11:27:38+5:302018-08-21T11:28:12+5:30
रेवण्णा यांनी किमान सौजन्य दाखवायला हवे होते, ते आपल्या कुटुंबीयांनाही असेच वागवतील का असा प्रश्न काही लोकांनी समाजमाध्यमांमध्ये विचारला आहे.
बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे बंधू आणि मंत्री एच. डी. रेवण्णा नव्या वादात सापडले आहेत. पूरग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या नावाखाली त्यांच्या अंगावर बिस्किटांचे पुडे फेकण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील आश्रयछावणीमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रेवण्णा यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रेवण्णा 'असंवेदनशील' असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.
एच.डी. रेवण्णा हसन जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले होते. यावेळेस बिस्किटांचे पुडे लोकांच्या हातामध्ये देणे शक्य असूनही ते त्यांच्या दिशेने फेकत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर रेवण्णा यांनी किमान संवेदनांचे भान राखत वागायला हवे होते अशा भावना व्यक्त होत आहेत. रेवण्णा यांच्याबरोबर अर्कालगुडुचे मदार एटी रामस्वामीसुद्धा उपस्थित होते.
#KarnatakaFloods
— Subodh Srivastava (@SubodhK_) August 21, 2018
This is HD Revanna, Karnataka PWD Minister throwing biscuit packs at people who lost homes, crops due to rain, flood on Sunday in Hassan.
I feel disgusted seeing this. If you cannot give, then do not. But please do not throw food. pic.twitter.com/nEnNDidf4F
भाजपाचे नेते एस, सुरेश कुमार यांनी रेवण्णा यांच्यावर टीका करताना, प्रिय सार्वजनिक बांधकाम मंत्री, पूरग्रस्तांवर बिस्किटे फेकणे म्हणजे सार्वजनिक काम नव्हे. तुमची वाढलेली आत्मप्रौढी आणि अयोग्य वर्तन हेच बिस्किटे फेकण्याचे कारण आहे का? असा प्रश्न रेवण्णा यांना विचारला आहे.
रेवण्णा यांनी किमान सौजन्य दाखवायला हवे होते, ते आपल्या कुटुंबीयांनाही असेच वागवतील का असा प्रश्न काही लोकांनी समाजमाध्यमांमध्ये विचारला आहे.
रेवण्णा यांच्या मदतीला त्यांचे भाऊ व मुख्यमंत्री कुमारस्वामी धावून आले आहेत. रेवण्णा यांनी आपल्या वर्तनातून कोणताही उद्धटपणा प्रदर्शित केलेला नाही. तेथे लोकांची फारच गर्दी होती त्यामुळे हालचाल करण्यास जागा नव्हती असे स्पष्टीकरण कुमारस्वामी यांनी केले आहे. रेवण्णा यांचे पूत्र प्रज्ज्वल रेवण्णा यांनीही आपल्या वडिलांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असून आपले वडिल विनम्र आहेत आणि त्यांना पूरग्रस्तांची मदत करायची होती असे म्हटले आहे.