स्वदेशी वस्तूंसाठी आग्रही हीच गांधीजींना आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 05:56 AM2021-03-13T05:56:16+5:302021-03-13T05:56:48+5:30
मोदी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवास प्रारंभ
अहमदाबाद : स्वदेशी वस्तूंसाठी आग्रही असणे हीच महात्मा गांधी व स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र सरकारने साबरमती आश्रमामध्ये आयोजिलेल्या ‘स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्या वेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात १५ ऑगस्ट २०२३पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशातील अज्ञात तसेच फारसे प्रसिद्ध नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास जपण्यासाठी गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारने नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत.
मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आली. त्या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जपण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात यंदा १२ मार्च रोजीच करण्यात आली.