बूट, टोपी काढून तपासणी; संसदेत कडक सुरक्षाव्यवस्था, पंतप्रधान म्हणाले, घुसखोरीची गांभीर्याने दखल घेऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 08:02 AM2023-12-15T08:02:38+5:302023-12-15T08:03:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या मंत्र्यांना संसदेत घुसखोरी ही घटना गांभीर्याने घेऊन सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.
संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या मंत्र्यांना संसदेत घुसखोरी ही घटना गांभीर्याने घेऊन सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा राजकारणापासून दूर ठेवला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या कडक आणि स्पष्ट सूचनेनंतर गुरुवारी संसदेत अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली.
संसदेमध्ये बुधवारी घुसखाेरी झाल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर संसद व जवळपासच्या परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली. संसदेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरू झाली, अभ्यागतांची ओळखपत्रे तपासण्यात आली. पहिल्यांदाच संसदेच्या कर्मचाऱ्यांसह अनेकांची टोपी आणि बूट काढून तपासणी करण्यात आली. संसदेतील बुधवारच्या घटनेनंतर गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल, अनुराग ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची संसदेतील त्यांच्या कक्षात बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांना स्पष्ट सूचना दिल्या. ही घटना डोळे उघडणारी आहे, ज्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे आणि
संसदेच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतेही राजकारण होऊ नये, असे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या वाहनांनाही थांबा नाही
खासदारांची अवस्था इतकी बिकट झाली की त्यांची वाहने संसदेत क्षणभरही थांबू दिली गेली नाहीत. खासदारांच्या खासगी सचिवांनाही प्रवेश बंद करण्यात आला.
केंद्रीय मंत्र्यांच्या वाहनांनाही संसद भवनात थांबू दिले जात नाही आणि त्यांना सतत फिरते राहण्यास सांगितले जात आहे.
दहशतवादी पन्नूकडून घुसखोरांना मदत जाहीर
संसदेवरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच बुधवारी लोकसभेत घुसखोरीचे प्रकरण घडले. त्यानंतर आता ‘शीख फॉर जस्टीस’ या अतिरेकी संघटनेचा दहशतवादी गुरपतवंत पन्नू याने सहभागी घुसखोरांना कायदेशीर लढाईसाठी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
प्रसार माध्यमांना केले दूर
नवीन संसदेचे मुख्य प्रवेशद्वार, मकरद्वार येथे ज्या ठिकाणी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जमतात, जेथे राजकारण्यांचे ‘बाइट’ घेतले जातात, ती जागा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सील केली आणि त्यांना संसदेच्या मुख्य गेटपासून १०० मीटर अंतरावर सर्वात वाईट जागा देण्यात आली.
आता गरूड गेट, शार्दुल गेटमधून व्हीआयपी प्रवेश
आता व्हीआयपींना नव्या संसदेत प्रवेशासाठी अर्धा फेरा मारावा लागणार आहे. मिझोरामचे नवे मुख्यमंत्री लालदुहोमा गुरुवारी संसद भवनात आले तेव्हा त्यांना मुख्य गेटपासून गरूड गेटपर्यंत चालत जावे लागले.
आधी मुख्यमंत्र्यांची गाडी थेट जुन्या संसदेच्या मुख्य गेटवर पोहचायची. अशीच परिस्थिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याबाबत घडली.
त्यांना संसदेत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी नवीन संसदेच्या मुख्य गेटपासून गरूड द्वारपर्यंत चालत जावे लागले.
लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न
संसदेची सुरक्षा भेदण्याच्या अतिशय गंभीर प्रकारावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्याकडून प्रयत्न सुुरू असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. संसदेमध्ये घुसखोरी केलेल्यांनी भाजप खासदाराकडून पास घेतले होते याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले.