पोलीस महानिरीक्षकच कॉपी करताना सापडले
By Admin | Published: May 5, 2015 03:30 AM2015-05-05T03:30:07+5:302015-05-05T03:30:07+5:30
बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आल्याने पोलीस
कोची/ कोझीकोड : बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आल्याने पोलीस आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महानिरीक्षक महाशयांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
त्रिस्सूर क्षेत्राचे महानिरीक्षक असलेले टी.जी. जोसे यांनी मात्र कॉपी करताना पकडल्याचा आरोप साफ फेटाळून लावत मंगळवारच्या पेपरला हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कलामस्सेरी येथील सेंट पॉल महाविद्यालयात एलएलएमचा क्राईम- २ पेपर सुरू असताना जोसे हे कॉपीवरून उत्तर लिहीत असताना आढळून आले.
त्यांना पकडणाऱ्या परीक्षा निरीक्षकाला आपण आयपीएस अधिकाऱ्याची कॉपी पकडली हे माहीत नव्हते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जोसे हे दोषी आढळल्यास त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जाईल, असे महात्मा गांधी विद्यापीठाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)