आणखी उंच झेप घेण्याची प्रेरणा!
By admin | Published: September 25, 2014 04:05 AM2014-09-25T04:05:23+5:302014-09-25T04:06:36+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मार्स आॅर्बिटर मिशन अर्थात मंगळयानाच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले़ ही उपलब्धी देशातील संशोधकांना आणखी उंच झेप घेण्याची प्रेरणा
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मार्स आॅर्बिटर मिशन अर्थात मंगळयानाच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले़ ही उपलब्धी देशातील संशोधकांना आणखी उंच झेप घेण्याची प्रेरणा देईल, असे ते म्हणाले़ राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या यशासाठी इस्रोचे अभिनंदन केले़
इस्रोचे अध्यक्ष के़राधाकृष्णन यांना पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, मी मंगळ मोहिमेच्या यशासाठी आपल्याला व आपल्या चमूला शुभेच्छा देतो़ या यशानंतर मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा पहिला देश बनला आहे़ देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे़ आपल्या अंतराळ कार्यक्रमात ऐतिहासिक अशी ही उपलब्धी देशातील सर्व क्षेत्रातील संशोधकांना आणखी उंच झेप घेण्यासाठी प्रेरित करेल, असा मला विश्वास वाटतो़ आपले सर्व सहकारी शास्त्रज्ञ, अभियंत्रे, तंत्रज्ञ आणि या यशात वाटा असणाऱ्या सर्वांपर्यंत कृपया माझ्या या शुभेच्छा पोहोचवा़ या शुभेच्छा संदेशानंतर राष्ट्रपतींनी टिष्ट्वटरवरूनही इस्रोला शुभेच्छा दिल्या़ मंगळयानाच्या यशासाठी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदऩ देशाला या ऐतिहासिक उपलब्धीवर गर्व आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले़ उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी शास्त्रज्ञांची पाठ थोपटली़ संपूर्ण देश तुम्हाला सलाम करतो, असे ते म्हणाले़ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोला पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात आजची उपलब्धी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला़