प्रेरणादायी! UPSC साठी नाकारल्या ISRO सह 6 सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात IPS
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 10:23 AM2023-05-08T10:23:03+5:302023-05-08T10:29:12+5:30
तृप्ती भट यांनी नोकरीच्या या सर्व मोठ्या ऑफर सोडून यूपीएससीची परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण त्यांनी आयपीएस ऑफिसर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अनेकांचा प्रवास हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीजण प्रचंड मेहनत घेतात. ध्येय गाठण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आयपीएस तृप्ती भट यांची गोष्टही अशीच आहे. UPSC साठी त्यांनी 6 सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या. इतकच नाही तर ISRO मधली मोठी ऑफरही तृप्ती यांनी नाकारली.
आयपीएस ऑफिसर तृप्ती भट या उत्तराखंडच्या अल्मोडाच्या रहिवासी आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तसेच चार भावंडामध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. बारावीनंतर त्यांनी पंतनगर युनिव्हर्सिटीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केलं. तृप्ती यांनी ISRO सह सहा नोकऱ्यांसाठीची परीक्षा पास केली होती. तसेच अनेक प्रसिद्ध खासगी संस्थांकडून त्यांना जॉबची ऑफर होती.
तृप्ती भट यांनी नोकरीच्या या सर्व मोठ्या ऑफर सोडून यूपीएससीची परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण त्यांनी आयपीएस ऑफिसर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पहिल्याच प्रयत्नात तृप्ती यांनी यूपीएससीची परीक्षा पास केली आणि 165 रँक मिळवत IPS ऑफिसर झाल्या.
आयपीएस तृप्ती भट यांनी राष्ट्रीय स्तरावर 16 व 14 किमी मॅरेथॉन आणि राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. यासोबतच त्या तायकांडो आणि कराटेमध्ये देखील पारंगत आहेत. तृप्ती यांच्या प्रवासातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.