कौतुकास्पद! शिक्षिकेच्या कार्याला सलाम; पहिल्या पगारातून गरीब मुलांना साहित्य वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:28 PM2024-04-19T12:28:08+5:302024-04-19T12:31:37+5:30
स्नेहा शर्मा या शिक्षिकेने गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले.
सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल हे सांगता येणार नाही. अनेकदा फोटो, व्हिडीओ आणि डान्स करून तरूणाई प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. पण, बिहारमधील एक शिक्षिका तिच्या कौतुकास्पद कार्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. आयुष्यातील पहिली नोकरी आणि पहिला पगार हा सर्वांसाठी खास असतो. याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. काही लोक त्यांच्या पहिल्या पगारातून अशा काही गोष्टींची खरेदी करतात, ज्या आठवणी म्हणून सोबत राहतात. अनेकजण आपल्या घरातल्यांना भेटवस्तू देऊन हा क्षण साजरा करत असतात. मात्र, बिहारमधील एका शिक्षिकेने गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले.
बिहार लोकसेवा आयोगात कार्यरत असलेल्या शिक्षिका स्नेहा शर्मा यांनी अनेकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या पगारातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील बेगुसराय येथील या शिक्षिकेने पहिल्या पगारातून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना अभ्यासाचे साहित्य दिले. मुलांना दप्तर, पेन, पाण्याच्या बॉटल्स आदींचे वाटप करण्यात आले. स्नेहा यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मुलांना दप्तरांचे वाटप
स्नेहा शर्मा यांनी बीपीएससी परीक्षेत यश मिळवून शिक्षक होण्याचा मान पटकावला. त्या बेगुसराय येथील राधादेवी गर्ल्स मिडल स्कूलमध्ये कार्यरत आहेत. शिक्षिका झाल्यानंतर स्नेहा यांनी आपल्या आयुष्यातील पहिली कमाई इकडे-तिकडे खर्च करण्याऐवजी शाळेतील मुलांना साहित्य वाटप करून १२० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले.
या शाळेतील इतरही शिक्षक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून शालेय साहित्य देत असतात. ही संस्था त्यांच्या फाऊंडेशनच्या वतीने आणि लोकांच्या सहकार्याने २०१९ पासून चालवली जात आहे. मुलांना शाळेत तायक्वांदोचे प्रशिक्षण देखील दिले जाते. या शाळेत झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.