लेक असावी तर अशी! कुटुंबासाठी B.Tech इंजिनियर मुलगी बनली कॅब ड्रायव्हर, जिद्दीला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 03:46 PM2023-05-03T15:46:34+5:302023-05-03T15:47:26+5:30
उबेर कॅब ड्रायव्हर दीप्ती घोष बीटेक इंजिनिअर होती, पण तिने अचानक कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली.
देश असो वा जग... सर्वत्र स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत आणि कठीण प्रसंगांशी सहज जुळवून घेत आहेत. अशाच एका धाडसी महिलेची गोष्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. कोलकाताची उबेर कॅब ड्रायव्हर दीप्ती घोष बीटेक इंजिनिअर होती, पण तिने अचानक कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. फेसबुक युजर परम कल्याण सिंह याने जेव्हा दीप्तीची गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा तिच्या हिंमतीला लोकांनी सलाम केला आहे.
परमने लिहिले - "काल मी लेक मॉलला जाण्यासाठी कॅब बुक केली. मला एका लेडी ड्रायव्हरचा फोन आला. मला आश्चर्य वाटले की त्या बाईने ना पेमेंट मोड विचारले ना ड्रॉप लोकेशन, तिने अगदी शांतपणे पिकअप लोकेशन विचारले. त्यानंतर मी तिला येण्यास सांगितले आणि तिच्या प्रोफाइलमध्ये तिचे नाव दीप्ती घोष पाहिले. कॅबमध्ये बसताना ड्रायव्हरची बोलण्याची पद्धत एखाद्या सुशिक्षित बाईसारखी होती, म्हणून मी तिला तिची शैक्षणिक पार्श्वभूमी विचारली. तिने जे सांगितले ते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दीप्ती ही बीटेक पदवीधर इलेक्ट्रिकल इंजिनीअर होती आणि तिने 6 वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामही केले होते. आता माझ्या मनात प्रश्न आला की दीप्तीला कॅब चालवायची काय गरज होती?"
"यानंतर मला कळले की 2020 मध्ये दीप्तीच्या वडिलांचे निधन झाले होते. तिच्या घरी आई आणि धाकटी बहीण होती. दीप्तीला मिळालेल्या सर्व जॉब ऑफर कोलकात्याच्या बाहेरच्या होत्या. अशा परिस्थितीत आपल्या बहिणीला आणि आईला सोडून इतर कोणत्याही शहरात जाणे तिच्यासाठी कठीण होते आणि तिला नोकरीचीही गरज होती. दीप्तीला ड्रायव्हिंग येत होते. अशा परिस्थितीत कठोर निर्णय घेत तिने स्वत:साठी व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं. अल्टो कार खरेदी केली आणि 2021 पासून कॅब कंपनी उबेरमध्ये काम करण्यास सुरुवात केली."
दीप्ती 6-7 तास कॅब चालवून महिन्याला सुमारे 40 हजार रुपये कमावते आणि सध्या ती तिच्या कामात खूश आहे. सोशल मीडियावर दीप्तीची ही कहाणी वाचल्यानंतर लोक तिच्या जिद्दीला सलाम करत आहेत आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मुलगी असेल तर ती अशीच असावी, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी एका युजरने लिहिले - आई आणि कुटुंबासाठी करिअर सोडणे ही काही छोटी गोष्ट नाही. जर देवाची इच्छा असेल तर तुम्हाला खूप आनंद मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"