कोळिंद्रेत मातब्बर उमेदवारांकडून चाचपणी

By admin | Published: December 21, 2016 10:25 PM2016-12-21T22:25:32+5:302016-12-21T22:25:32+5:30

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला : तालुक्यात कारखाना निवडणुकीपासून महाआघाडीची लाट, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही

Inspiring Candidates in Kolindre | कोळिंद्रेत मातब्बर उमेदवारांकडून चाचपणी

कोळिंद्रेत मातब्बर उमेदवारांकडून चाचपणी

Next

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा --राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या कोळिंद्रे जि. प. मतदारसंघात मातब्बर उमेदवारांनी तयारी चालविल्याने व तालुक्यात कारखाना निवडणुकीत महाआघाडीची लाट असल्याने राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारच नाहीत, अशी विचित्र परिस्थिती कोळिंद्रे जि. प. मतदारसंघात असताना महाआघाडीकडून आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता रमेश रेडेकर व हिराबाई विष्णुपंत केसरकर यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. माजी जि. प. सदस्या श्रीमती अंजनाताई रेडेकर यावेळी चालून आलेली संधी सोडतील, असे दिसत नाही. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर विद्यमान सदस्या संजीवनी गुरव राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.
गेल्या पाच वर्षांत विष्णुपंत केसरकर यांनी आपल्या पंचायत समिती सभापतिपदाची ताकद लावून बऱ्यापैकी विकासकामे केली आहेत; परंतु नशिबाने त्यांना यावेळी साथ न दिल्याने आरक्षण महिला राखीव प्रवर्गाकडे गेल्याने आपोआपच ते स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. रमेश रेडेकर यांनीही या मतदारसंघात चांगलीच मशागत केली आहे. दोघांनीही यावेळी महाआघाडीकडून अनुक्रमे हिरा केसरकर व सुनीता रेडेकर यांची नावे पुढे केली आहेत. दोघेही आपल्या निर्णयावर ठाम आहेत, असे सध्या तरी दिसते. तर केदारी रेडेकर संस्था समूहाच्या सर्वेसर्वा श्रीमती अंजनाताई रेडेकर ही संधी सोडणार नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
एकेकाळी तीन मातब्बर उमेदवार रिंगणात दिसत असताना राष्ट्रवादी मात्र उमेदवाराच्या शोधात आहे. गुरव या राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्या तरी केसरकर, रेडेकर यांची ताकद यावेळी त्यांच्यामागे राहणार नसल्याने विजयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बरीच दमछाक होणार आहे.
पक्ष म्हणून राष्ट्रवादी इतरांच्या तुलनेत या मतदारसंघात आजही भक्कम अवस्थेत आहे; परंतु कार्यकर्त्यांचे आपापल्या नेत्यांवरचे प्रेम कायम असल्याने कार्यकर्ते निष्ठेने पक्षाच्या ‘अधिकृत’ उमेदवाराच्या पाठीशी कितपत राहणार, यावर यशापयश अवलंबून राहणार आहे.
या मतदारसंघात गमतीचा भाग म्हणजे गजरगाव व मलिग्रे पंचायत समिती उमेदवारीची चर्चाही दिसत नाही. याऊलट प्रत्येकजण जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी करू लागला आहे. श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा एकमेव अपवाद वगळता
राष्ट्रवादीचेच वर्चस्व या मतदारसंघावर राहिले आहे. राष्ट्रवादीचे नेते या मतदारसंघात किती गांभीर्याने लक्ष घालणार, यावरही येथील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कदाचित राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात उमेदवारीबाबत ऐनवेळी धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोळींद्रे
न्यायालयात दाद
सलग दुसऱ्यावेळी या जि. प. मतदारसंघात महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे याप्रकरणी यशवंत गिरी यांनी न्यायालयात दाद मागितली असून, न्यायालयीन निर्णयावरही येथील समीकरणे अवलंबून आहेत.
महाआघाडीची ताकद
विष्णुपंत केसरकर, रमेश रेडेकर, दिगंबर देसाई, राजू होलम, आनंदराव कुलकर्णी, विकास बागडी.
विरोधी ताकद
अल्बर्ट डिसोझा, सुभाष देसाई, अनिल फडके, महादेव पोवार, मसणू सुतार, संभाजी पाटील, विजय देसाई, विलास पाटील.

जि.प. संभाव्य उमेदवार
हिराबाई केसरकर (महाआघाडी/अपक्ष),
सुनीता रेडेकर (महाआघाडी/ अपक्ष), संजीवनी गुरव (राष्ट्रवादी), अंजना रेडेकर (राष्ट्रीय काँगे्रस)
विधानसभेत राष्ट्रवादीला कौल
गेली १५ वर्षे विधानसभा निवडणुकीत या जि.प. मतदारसंघाने राष्ट्रवादी काँगे्रसला मताधिक्य दिले आहे. काँगे्रस, सेना यांना या मतदारसंघात फारसा करिश्मा दाखविता आलेला नाही.


राष्ट्रवादीला शोध उमेदवाराचा
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या या मतदारसंघातील अनेक मंडळी सद्य:स्थितीत महाआघाडीत दाखल झाली आहेत.
यामुळे यावेळी राष्ट्रवादीला सक्षम उमेदवाराचा शोध करावा लागत आहे. सुनीता रेडेकर व हिरा केसरकर या महाआघाडीतून इच्छुक आहेत.


‘कमळ’ रुजलं;पण फुलण्याची शक्यता नाही
भाजपने या मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांत अनेक गावांत शाखा उघडून तरुणांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.
तरुणाईच्या आकर्षणामुळे भाजपचे कमळ गावागावांत रुजले आहे; परंतु मातब्बर उमेदवारांमुळे ते यावेळी फुलण्याची शक्यता दिसत नाही.

Web Title: Inspiring Candidates in Kolindre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.