रुग्णालयांच्या परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवा! महाविद्यालयांना वैद्यकीय आयोगाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 09:43 AM2024-08-15T09:43:35+5:302024-08-15T09:49:57+5:30
कोलकाता येथील निवासी डॉक्टरच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोलकाता येथील निवासी डॉक्टरच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीयमहाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात महाविद्यालयांत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी धोरण तयार करण्याबरोबरच रुग्णालय परिसरात संध्याकाळी पुरेशी प्रकाश योजना करावी आणि असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत आदी सूचनांचा समावेश आहे.
कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या सर्व प्रकरणाची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने गंभीर दखल घेतली असून, डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मेडिकल कॉलेजने काय करावे?
- सुरक्षेच्या अनुषंगाने धोरण तयार करताना ओपीडी, वॉर्ड्स, अति तत्काळ विभाग, वसतिगृहे, निवासी डॉक्टरांच्या इमारती आणि संपूर्ण रुग्णालय परिसराचा विचार करावा.
- रुग्णालयाच्या आत आणि रुग्णालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, ज्यामुळे आरोग्य कर्मचारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकेल. तसेच सर्व असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.
- रुग्णालय परिसरात पुरेशा प्रमाणात महिला आणि पुरुष सुरक्षारक्षकांची नियुक्ती करा.
- कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ चौकशी करून पोलिसांत तक्रार करा. ४८ तासांत वैद्यकीय आयोगाला माहिती द्या.