श्री रामलल्ला मूर्तीची अयोध्येत तात्पुरत्या ठिकाणी प्रतिष्ठापना; साडेनऊ किलोच्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:54 AM2020-03-26T02:54:11+5:302020-03-26T06:07:00+5:30
सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जागी भव्य राममंदिराची उभारणी होईपर्यंत रामलल्ला या नवीन तात्पुरत्या ठिकाणी विराजमान असतील.
अयोध्या : श्री रामलल्लांच्या मूर्तीची विधिवत पूजा-आरतीने नवीन तात्पुरत्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ४९२ वर्षांनंतर श्री रामलल्ला साडेनऊ किलोच्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. मंगळवारी रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत पूजा-विधी करून श्री रामजन्मभूमी येथे शेवटची आरती करण्यात आली. यासोबतच राममंदिर उभारण्यासाठी ही जागा रिकामी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जागी भव्य राममंदिराची उभारणी होईपर्यंत रामलल्ला या नवीन तात्पुरत्या ठिकाणी विराजमान असतील. चैत्र प्रतिपदा आणि नव संवत्सराच्या सुरुवातीलाच श्री रामलल्ला आणि अन्य मूर्ती स्वतंत्र पालख्यांत बसवून तात्पुरत्या नवीन मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत पूजा-अर्चा, अभिषेक, आरती आदी विधी चालले. त्यानंतर श्री रामलल्लांचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडून ११ लाख रुपयांची देणगी
- मानस भवननजीक एका तात्पुरत्या मंदिरात श्री रामलल्ला यांची मूर्ती स्थानांतरित करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष आरती केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राममंदिर उभारण्यासाठी वैयक्तिक ११ लाख रुपयांची देणगी दिली.