बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन, पानटपरी सुरू करावी; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:09 AM2018-04-30T02:09:55+5:302018-04-30T02:09:55+5:30
सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.
आगरतळा : सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन करावे किंवा पानटपरी सुरु करावी, अशी मुक्ताफळे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी उधळली आहेत. भाजपा नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवरून वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावलेला असतानाच बिप्लव देव यांनी त्यांना आणखी एका विधानाची भर टाकली आहे. त्रिपुरातील एका चर्चासत्राचे उद्घाटन करताना बिप्लव देव पुढे म्हणाले की, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी युवक अनेक वर्षे राजकारण्यांच्या मागे धावत असतात. त्यामुळे या युवकांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात. त्याऐवजी त्यांनी पानटपरीचा धंदा केला असता तर एव्हाना त्या प्रत्येक युवकाच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपर्यंत शिल्लक जमा झाली असती.
बिप्लव देव अलीकडेच ऐश्वर्या राय व डायना हेडनची तुलना करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
७५ हजार रुपयांच्या कर्जातून सुरू केलेल्या व्यवसायातून युवक दर महिना २५ हजारांचे उत्पन्न मिळवू शकतो. पदवीधर झाल्यानंतर शेती, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करणे युवक कमीपणाचे समजतात. अशा विचारांमुळेच गेल्या २५ वर्षांत त्रिपुरातील युवक फारशी प्रगती करू शकले नाहीत.
पदवीधर युवकांनी गोपालनाचा व्यवसाय सुरू करावा, असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात गायी पाळल्या गेल्या पाहिजेत. गायीच्या दुधाला दर लीटरला ५० रुपये भाव मिळतो. गेल्या दहा वर्षांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधराने याच कालावधीत गोपालनाचा व्यवसाय केला असता, तर एव्हाना त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपयांची शिल्लक जमा झाली असती.