तोंड बंद करण्याऐवजी मलाच अॅम्बेसॅडर नेमा!
By admin | Published: January 24, 2017 01:01 AM2017-01-24T01:01:38+5:302017-01-24T01:01:38+5:30
‘कोणी पैसे दिले तर ते अवश्य घ्या, पण मतदान आम्हाला करा’ या गोव्यातील प्रचारसभेत केलेल्या विधानाबद्दल आपली निर्भत्सना
नवी दिल्ली : ‘कोणी पैसे दिले तर ते अवश्य घ्या, पण मतदान आम्हाला करा’ या गोव्यातील प्रचारसभेत केलेल्या विधानाबद्दल आपली निर्भत्सना करून यापुढे पुन्हा असे विधान केले तर माझ्या पक्षाची मान्यताही काढून घेण्याचा विचार केला जाईल, हा आदेश मागे घ्यावा. एवढेच नव्हे तर निवडणुकीतील धनशक्तीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी उलट तुम्हीच मला तुमचा अॅम्बॅसॅडर नेमा, असे रोखठोक पत्र दिल्लीच मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगास लिहिले आहे.
गोव्यातील विधानाबद्दल कडक शब्दांत समज दिल्याबद्दल केजरीवाल यांनी आधी प्रचारसभांमध्ये व माध्यमांमधून आयोगावर सडकून टीका केली होती. आता तोच बंडखोरीचा सूर कायम ठेवून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांनी हे पत्र लिहिले आहे.
केजरीवाल लिहितात, काहीही चुकीचे बोललेलो नाही. जे पैसे देतील त्यांना मत द्या, असे मतदारांना सांगितले असते तर तो भ्रष्टाचार ठरला असता. पण मी नेमके याच्या उलट म्हणजे जे पैसे देतील त्यांना मत देऊ नका, असे सांगत आहे. खरे तर माझ्या या विधानाने मतदारांना पैसे वाटणे बंद होईल. कारण लोक पैसे घेऊनही आपल्याला मते देत नाहीत, असे दिसल्यावर राजकीय पक्ष आपणहूनच मतदारांना पैसे वाटणे बंद करतील.
दिल्लीच्या निवडणुकीत आमच्या पक्षाने हेच करून दाखविले. आमच्या अशा प्रचारामुळे लोकांनी काँग्रेस व भाजपाकडून पैसे घेतले व मते आम्हाला दिली, असा दावा करून केजरीवाल झैदी यांना म्हणतात की, खरे तर ‘पैसे देणाऱ्यांना मते देऊ नका’ हे निवडणूक आयोगाने घोषवाक्य म्हणून स्वीकारून त्याच्या प्रचारासाठी माझी ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ म्हणून नेमणूक करायला हवी! केजरीवाल पत्रात म्हणतात की, निवडणुकांमधील पैशाचा वापर बंद व्हावा यासाठी निवडणूक आयोग गेली ७० वर्षे प्रयत्न करीत आहे. पण त्याचा उपयोग न होता उलट धनशक्तीचा प्रभाव वाढत चालला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)