दहशतवाद्यांचे टार्गेट काश्मीरऐवजी जम्मू, पर्यटकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:56 AM2024-06-15T06:56:39+5:302024-06-15T06:58:01+5:30
Terrorists Target Jammu: काश्मीर, पंजाबमधून येणाऱ्या दहशतवाद्यांच्या तावडीत अडकलेल्या जम्मूतील नागरिकांच्या चिंतेत वाढत्या दहशतवादामुळे भर पडली आहे. तीर्थक्षेत्र वैष्णोदेवी आणि जम्मू विभागात येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांमध्ये दहशत पसरवून जम्मूचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा दहशतवाद्यांचा डाव स्पष्ट दिसत आहे.
- सुरेश एस. डुग्गर
जम्मू - काश्मीर, पंजाबमधून येणाऱ्या दहशतवाद्यांच्या तावडीत अडकलेल्या जम्मूतील नागरिकांच्या चिंतेत वाढत्या दहशतवादामुळे भर पडली आहे. तीर्थक्षेत्र वैष्णोदेवी आणि जम्मू विभागात येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांमध्ये दहशत पसरवून जम्मूचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा दहशतवाद्यांचा डाव स्पष्ट दिसत आहे.
अशा परिस्थितीत १५ दिवसांनी सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेची सर्वांत मोठी चिंता आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरक्षा दल जम्मू विभागातील अनेक भागांत दहशतवाद्यांशी लढत आहे आणि इतर भागात दहशतवादी घुसल्याच्या अफवा पसरत आहेत. दोन आत्मघाती दहशतवादी मारले गेले असले तरी डझनभरांच्या शोधात अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. पोलिसांचे इशारे आणि कधीही कुठेही आत्मघातकी हल्ले होण्याची भीती यामुळे जम्मूच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पडू लागले हे निश्चित.
नेमके काय केले
ताजे हल्ले राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर झाले, ते लोकांना घाबरविण्यासाठी पुरेसे ठरले. लष्कराला लोकांच्या मनात घुसलेली भीती दूर करण्यात सध्या तरी यश आलेले नाही.
सर्वांत मोठी समस्या...
सुरक्षा दलांसाठी सर्वात मोठी समस्या ही आहे की दहशतवादी 'स्लीपर सेल' आणि कार्यकर्ते बनून हल्ले करत आहेत. त्यांच्यावर कारवाईही होत आहे, परंतु तोपर्यंत ते शांतता भंग करण्यात तसेच अर्थव्यवस्था नष्ट करण्यात यशस्वी ठरत आहेत. सीमा भागात स्थलांतरित नागरिक आणि भाडेकरूंची माहिती लपविल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत, कारण त्यांच्यापैकी बरेच जण दहशतवाद्यांचे समर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे.