स्लीपर कोचऐवजी चेअर कार, प्रभूंचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव
By admin | Published: November 20, 2014 09:55 AM2014-11-20T09:55:55+5:302014-11-20T09:56:56+5:30
१० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या रेल्वे प्रवासासाठी स्लीपर कोचऐवजी चेअर कारचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रभूंनी मांडला असून यामुळे रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये वाढ होईल असा दावा केला जात आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - रेल्वेमधील वाढती प्रवासी संख्या आणि त्यातुलनेत कमी पडणारी आसन क्षमता यावर नवनियुक्त रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तोडगा काढला आहे. १० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या रेल्वे प्रवासासाठी स्लीपर कोचऐवजी चेअर कारचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रभूंनी मांडला असून यामुळे रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये वाढ होईल असा दावा केला जात आहे.
रेल्वेच्या विकासासाठी सुरेश प्रभू कामाला लागले आहेत. प्रवासी क्षमता आणि त्यातुलेनत अपु-या पडणा-या गाड्या ही रेल्वे मंत्रालयासमोरील प्रमुख समस्या आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रभू यांनी एक प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर मांडला आहे. यानुसार १० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या प्रवासामध्ये स्लीपरऐवजी चेअर कोच जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये रात्रीच्या प्रवासातही हीच पद्धत अवलंबवावी त्यामुळे प्रवासी नेण्याची क्षमता वाढू शकेल असे प्रभूंचे म्हणणे आहे. सणासुदी आणि सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ होते. अशा वेळी ही पद्धत जास्त उपयुक्त ठरेल. यासोबतच लहान अंतरावर धावणा-या एक्सप्रेस गाड्यांऐवजी तिथे जास्तीत जास्त डबल डेकर गाड्यांचा वापरही करावा असे या प्रस्तावात म्हटले आहे. रेल्वे बोर्ड या प्रस्तावावर विचार करत असून सखोल अभ्यासानंतरच ते रेल्वे मंत्रालयाकडे त्यांचे मत मांडेल.
या प्रस्तावातील प्रमुख अडचणी
> दिवसाच्या प्रवासात तब्बल १० तास बसून प्रवास करणे एखाद्यावेळी शक्य होईल, पण रात्रीच्या वेळी तब्बल १० तास बसून प्रवास करण्यास प्रवासी तयारी होतील का हा मोठा प्रश्न आहे.
> सध्या लहान अंतरासाठी धावणा-या बहुसंख्य एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्लीपर कोचऐवजी चेअर कारचा वापर केला जातो. आता १० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या प्रवासासाठी आणखी चेअर कार कुठून आणायच्या असा प्रश्न रेल्वे अधिका-यांसमोर निर्माण झाला आहे.
> सर्वात मुख्य बाब म्हणजे प्रवासी संख्या वाढवण्याच्या नादात रेल्वेच्या तिजोरीला बसणारा फटका. स्लीपर कोचऐवजी चेअर कोच दिल्यास रेल्वेला भाडे कमी करावे लागेल. स्लीपरऐवजी चेअर कोच दिल्यास त्यामध्ये आणखी ३६ प्रवासी वाढतील. पण तिकीटाच्या दरांमधील तफावत पाहता रेल्वेला तोटाच होईल अशी भिती वर्तवली जात आहे.