कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश; आरोग्य मंत्रालयाचा राज्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:52 AM2021-07-19T05:52:38+5:302021-07-19T05:53:42+5:30
कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. याची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. याची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्व कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे तसेच सर्व क्षयरोग रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.
मध्यप्रदेशसह आंध्रप्रदेश, हैदराबाद आणि तामिळनाडूमध्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना क्षयरोग झाल्याचे आढळले होते. दररोज सुमारे १२ रुग्णांना क्षयरोगाचे निदान होत असल्यामुळे डॉक्टरांचीही चिंता वाढली होती. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने अधिक चाचण्या करण्याची सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. ऑगस्ट २०२० पासूनच्या कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. क्षयरोग आणि कोरोना तसेच क्षयरोग आणि सारी या रुग्णांचीही तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कमी प्रतिकारशक्तीमुळे जंतू हल्ला करतात...
कोरोनामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय पुरावे नाहीत. मात्र, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास क्षयरोगाचे जंतू हल्ला करू शकतात. कोरोनाचे विषाणू किंवा उपचारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढू शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.