राज्यसभा खासदारांसाठी सूचना जारी, हिवाळी अधिवेशनात करावे लागणार पालन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:45 PM2023-11-30T16:45:57+5:302023-11-30T16:58:14+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खासदारांना जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी राज्यसभा खासदारांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यसभेत उपस्थित होणाऱ्या विषयांची कोणतीही प्रसिद्धी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व राज्यसभा खासदारांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत सभापती नोटीस मंजूर करत नाहीत आणि इतर खासदारांना कळवत नाहीत तोपर्यंत या नोटिसा सार्वजनिक करू नयेत. तसेच, राज्यसभा खासदारांसाठी एप्रिल 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या हँडबुकमध्ये नमूद केलेल्या संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचे स्मरणपत्र देण्यात आले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खासदारांना जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. खासदारांनी अनावश्यक आणि वादग्रस्त विषय टाळावेत, असे यामध्ये म्हटले आहे. आत्तापर्यंत खासदार विशेषत: विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी नोटीस सार्वजनिक करत आले आहेत. मात्र आता ते थांबवण्यास सांगितले आहे.
सूचनांमधील महत्त्वाचे मुद्दे :
- थँक्स, थँक्यू, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा सभागृहात दिल्या जाऊ नयेत.
- सभापतींनी दिलेल्या व्यवस्थेच्या सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका होऊ नये.
- सभागृहात फलक लावू नका.
- सीटला पाठ दाखवू नये.
- सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडू नये. सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी.
- सभागृहात दोन सदस्य एकत्र उभे राहू शकत नाहीत.
- जर सदस्यांनी थेट सभापतींशी संपर्क साधला नाही तर ते अटेंडेंडद्वारे स्लिप पाठवू शकतात.
- सभासदांनी लिखित भाषणे वाचू नयेत.
- सभागृहात सदस्यांची उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे.
- जर एखादा सदस्य परवानगीशिवाय साठ दिवस गैरहजर राहिला तर त्याची जागा रिक्त घोषित केली जाऊ शकते.
- संसदेच्या आवारात धुम्रपान करण्यास बंदी आहे.
- सभागृहाच्या कामकाजाची व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. कोणत्याही सदस्याने हे करू नये.
- नवीन सदस्याचे पहिले भाषण, मेडन स्पीच, 15 मिनिटांपेक्षा जास्त नसावे आणि विषय सोडून देऊ नये.