राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 07:29 AM2024-01-05T07:29:40+5:302024-01-05T07:33:24+5:30

असा आहे भाजपचा लोकसभेचा प्लॅन...

Instructions to Rajya Sabha members to find Lok Sabha constituencies, tickets of some senior ministers will be cut | राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार

राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार

संजय शर्मा -

नवी दिल्ली : २०२४ ची लोकसभानिवडणूक  जिंकण्याच्या इराद्याने भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन डझनहून अधिक दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले जाणार आहे. राज्यसभेचे सदस्य असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनाही त्यांच्यासाठी मतदारसंघ शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले बडे नेते मैदानात उतरवले होते, ही रणनीती यशस्वी झाली. या पार्श्वभूमीवर आता भाजपला लोकसभा निवडणुकीतही हीच रणनीती पुन्हा अवलंबायची आहे. 

या रणनीतीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील दिग्गज  तीन डझनांहून अधिक केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाणार आहे. यात राज्यसभेचे सदस्य  असलेल्या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. 

राणे, गोयल महाराष्ट्रातून 
दिग्गज मंत्र्यांपैकी राज्यसभा सदस्य पीयूष गोयल व नारायण राणे यांना महाराष्ट्रातून, धर्मेंद्र प्रधान व अश्विनी वैष्णव यांना ओडिशा, मनसुख मांडवीय यांना गुजरात, भूपेंद्र यादव यांना हरयाणा, तर राजीव चंद्रशेखर यांना कर्नाटकातून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना गुनाऐवजी ग्वाल्हेर किंवा मुरैना मतदारसंघाचा पर्याय देण्यात आला आहे. २०१९ मध्ये शिंदे यांचा गुना मतदारसंघात भाजप उमेदवाराकडून पराभव झाला होता, नंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रीय मंत्री केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी वगळता सरकारमधील सर्व दिग्गज नेते निवडणूक रिंगणात उतरू शकतात.  

काही मंत्र्यांची तिकिटे कापणार
वय आणि कामगिरीच्या फुटपट्टीवर कमकुवत दिसणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांची तिकिटे कापली जाऊ शकतात. या नावांबाबत पंतप्रधान मोदी स्वतः निर्णय घेतील. मात्र, खुद्द काही केंद्रीय मंत्र्यांनीच पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात पुरुषोत्तम रुपाला, अश्विनी चौबे आदी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

राज्यांचे प्रभारी बदलणार
- लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप लवकरच राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त करणार आहे. काही राज्यांचे प्रभारीपद रिक्त होते आणि काही नवे प्रभारीही नियुक्त केले जाणार आहेत.
- लोकसभा निवडणुकीत शिवराज आणि वसुंधरा राजे या दोघांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कोण कुठून निवडणूक लढवणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढवतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील गांधीनगर,  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशातील लखनौ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमधून निवडणूक लढवतील. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीतून, तर अनुराग ठाकूर हमीरपूर मतदारसंघातून भाग्य अजमावतील. 
 

Web Title: Instructions to Rajya Sabha members to find Lok Sabha constituencies, tickets of some senior ministers will be cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.