चारा खाणाऱ्यांकडून अवमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लालूप्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 07:50 IST2025-02-25T07:50:06+5:302025-02-25T07:50:29+5:30
एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क भागलपूर : बिहारमध्ये जंगलराज आणणारे आता महाकुंभ मेळ्यावर अवमानकारक वक्तव्ये करत असल्याची टीका ...

चारा खाणाऱ्यांकडून अवमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लालूप्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीका
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
भागलपूर : बिहारमध्ये जंगलराज आणणारे आता महाकुंभ मेळ्यावर अवमानकारक वक्तव्ये करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. मोदी यांनी सांगितले की, आपल्या परंपरा, श्रद्धा यांच्याविषयी जंगलराजवाल्या लोकांच्या मनात द्वेष आहे. महाकुंभ मेळा हा भारताच्या ऐक्याचा सर्वांत मोठा उत्सव आहे. तिथे पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. बिहारमधूनही अनेक लोक या मेळ्यात जात आहेत, असेही ते म्हणाले.
मोदी यांनी सांगितले की, जंगलराज आणणारे अयोध्येतील राममंदिराच्या विरोधातही होते. यांना बिहारची जनता कधीच माफ करणार नाही. नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरील चंगेराचेंगरीसंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा मागताना लालूप्रसाद म्हणाले होते की, महाकुंभमेळा म्हणजे नेमके आहे तरी काय? सारा असमंजसपणाचा खेळ आहे. त्या वक्तव्याच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केली. (वृत्तसंस्था)
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले २२ हजार कोटी
देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता जारी केला. त्याचे ९.८० कोटी लाभार्थी असून, त्यांच्या खात्यात २२ हजार कोटी रुपये वळते करण्यात आले.
हा समारंभ बिहारमधील भागलपूर येथे सोमवारी पार पडला, तसेच बिहारमधील विविध योजनांचे उद्घाटन, तसेच शिलान्यास मोदी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याबाबत म्हणाले की, जे चारा चोरतात ते कधीही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करू शकत नाहीत.
‘आधीच्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. कृषी निर्यातीत अलीकडे झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळाला.
आता बिहारच्या मखानाची बाजारपेठही आम्ही वाढविणार आहोत. बिहारमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान, गिरीराजसिंग आणि चिराग पासवान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसकडून लांगुलचालन मतांसाठी : नितीशकुमार
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले की, विशिष्ट धर्मीयांच्या मतांसाठी त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेस व राजद आघाडीला जातीय दंगली कधीही रोखता आल्या नाहीत.
२००५ मध्ये आम्ही सत्तासूत्रे स्वीकारली तेव्हा बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेची अतिशय खराब स्थिती होती; पण आता परिस्थिती बदलली आहे.