"टेकऑफ होण्यापूर्वीच झालं क्रॅश लॅडिंग"; १९ वर्षांच्या संसारानंतर सुप्रीम कोर्टात घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:13 PM2021-09-15T19:13:24+5:302021-09-16T13:46:35+5:30
ट्रायल कोर्टात पतीला पत्नीपासून घटस्फोट मिळाला परंतु पत्नीने त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली.
नवी दिल्ली – लग्नाच्या १९ वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने एका जोडप्याला घटस्फोट दिला आहे. कारण लग्नाच्या दिवसापासून आतापर्यंत एकही दिवसं जोडपं एकत्र राहिलं नाही. लग्नाच्या सुरुवातीपासूनच हे संबंध संपले होते आणि टेकऑफच्या वेळीच क्रॅश लँडिंग झालं होतं. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने कलम १४२ च्या विशेषाधिकार वापरत हा निर्णय घेत लग्न झालेल्या जोडप्याच्या घटस्फोटाला परवानगी दिली आहे. न्या. संजय किशन कौल आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने तामिळनाडूतील एका जोडप्याच्या खटल्याचा निकाल देताना ही टीप्पणी केली आहे.
२००२ मध्ये या जोडप्याचं लग्न झालं होतं. दोघांमध्ये तडजोड होण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले. महिलेच्या इच्छेविरोधात हे लग्न झाल्याचा याचिकाकर्ते पतीचा आरोप होता. लग्न होताच ती मंडपातून निघून गेल्याचं त्याने सांगितले. खंडपीठाने महिलेने याचिकाकर्त्यावर अनेक खटले दाखल केल्याचं पाहिलं. तसेच कॉलेजच्या अधिकाऱ्यांकडेही महिलेने पतीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. या खटल्यावेळी पतीने सांगितले की, माझं आणि माझ्या पत्नीचे लग्न २००२ मध्ये झालं होतं. लग्नासाठी तिच्या आईवडिलांनी तिची परवानगी घेतली नव्हती असं पत्नीला वाटायचे. त्यामुळे ती लग्न झाल्यानंतर तात्काळ मंडपातून उठून निघून गेली. लग्नाच्या काही महिन्यांनी पत्नीने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली. इतकचं नाही तर माझ्या ऑफिसमध्येही अनेक पत्र पाठवून माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पतीने न्याय मिळवण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.
ट्रायल कोर्टात पतीला पत्नीपासून घटस्फोट मिळाला परंतु पत्नीने त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने घटस्फोटाचा निर्णय रद्द केला त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं. या प्रकरणाची दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, लग्नाच्या सुरुवातीला दोघांचे नातं संपलं होतं. दोन्ही पक्षाकडून समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पती अथवा पत्नीचे सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि खटलेबाजी क्रूरतेसारखी आहे. त्यामुळे घटस्फोटासाठी हे कारणीभूत आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे.