बिपीन रावत, ब्रिगेडियर लिद्दर यांच्यासह 7 अधिकाऱ्यांचा विमा क्लेम 30 मिनिटांत मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:24 PM2021-12-14T14:24:27+5:302021-12-14T14:25:33+5:30
बिपीन रावत व इतर सात सैन्य अधिकाऱ्यांचा इन्शुरन्स क्लेम यूनाइटेड इंडिया इंन्शुरन्स व बिग्रेडियर लिद्दर यांचा क्लेम न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने तात्काळ मंजूर केला
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचे निधन झाले. शुक्रवारी दिल्ली येथील कॅन्टोन्मेंटमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बिपीन रावत, ब्रिगेडियर एल.एस. लिद्दर आणि इतर 7 अधिकाऱ्यांच्या ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंटचा क्लेम अवघ्या 30 मिनिटांत मंजूर करण्यात आला. न्यू इंडिया इन्शुरन्स आणि युनाइटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीने शहीद कुटुंबीयांप्रती ही तत्परता दाखवली आहे.
बिपीन रावत व इतर सात सैन्य अधिकाऱ्यांचा इन्शुरन्स क्लेम यूनाइटेड इंडिया इंन्शुरन्स व बिग्रेडियर लिद्दर यांचा क्लेम न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने तात्काळ मंजूर केला. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक सत्यजीत त्रिपाठी यांनी सांगितले की, 10 डिसेंबर रोजी याबाबत माहिती मिळताच, कमीत कमी कागदपत्रांच्या गरजेतून ही तातडीची कार्यवाही करण्यात आली. रावेत यांच्यासह 8 सैन्य अधिकाऱ्यांचा विमा एसबीआय-जीपीए पॉलिसीअंतर्गत उतरविण्यात आला होता. तसेच, पीएनबी पॉलिसीच्या दोन इतर अधिकाऱ्यांचा विमा क्लेमही लवकरात लवकर करण्यात येईल, असे त्रिपाठी यांनी सांगितले. दरम्यान, तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर वेलिंगटन छावनीमधील लोकांनी जनरबल बिपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरमरण आलेल्या सर्वच जवानांचे स्मारक अपघातस्थळी बांधण्याची मागणी केली आहे. याबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे.
अंत्ययात्रेला मोठी गर्दी
जनरल रावत यांची अखेरची यात्रा अत्यंत भावनिक होती. संपूर्ण मार्गावर फुलांचा वर्षाव केला होता आणि हाती तिरंगा घेऊन जनरल बिपीन रावत अमर रहेच्या घोषणाही दिल्या जात होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी आर्मी कँट भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी भारताचे तिन्ही लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल रावत यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. जनरल रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यापूर्वी कधीही एखाद्या लष्करी अधिकाऱ्याच्या अंतिम दर्शनासाठी एवढी गर्दी जमली नव्हती. उपस्थितांनी पानावलेल्या डोळ्यांनी आपल्या हिरोला अखेरचा निरोप दिला.