विमा कंपन्या प्रीमियमचे दर वाढविणार
By Admin | Published: March 14, 2017 12:25 AM2017-03-14T00:25:08+5:302017-03-14T00:25:08+5:30
सर्वसाधारण विमा कंपन्या आपल्या प्रीमियमचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील दावे सोडविताना विमा कंपन्या तोट्यात येत आहेत
१० ते १५ टक्के वाढ : ‘इरडा’चा निर्णय एक एप्रिलपासून लागू
मुंबई : सर्वसाधारण विमा कंपन्या आपल्या प्रीमियमचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील दावे सोडविताना विमा कंपन्या तोट्यात येत आहेत. त्यातच व्याजाचे दर कमी झाल्याने अनेक कंपन्यांची गुंतवणूकही कमी होत आहे. यावर उपाय म्हणून विमा कंपन्या प्रीमियमचे दर वाढवत आहेत.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) यांनीदेखील वाहन विमा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा योजनेचा प्रीमियम एक एप्रिलपासून वाढविण्याचे संकेत दिलेले आहेत. इरडाचे सदस्य (सामान्य विमा) जी. जे. जोसफ यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले की, विमा कंपन्यांच्या १० अशा योजना आहेत की ज्यांचा प्रीमियम वाढविणे गरजेचे आहे. यात प्रापर्टी क्षेत्रातील सीमेंट, वीज आणि फार्मा, याबरोबर कुटुंब आरोग्य योजनांचाही समावेश आहे. या योजनांचा प्रीमियम एक एप्रिलपासून १० ते १५ टक्क्यांनी वाढविला जाऊ शकतो.
नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचे अध्यक्ष सनतकुमार म्हणाले की, मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी इतके मोठे आहेत की आम्हाला प्रीमियम वाढविण्यात तसूभरही वाव नाही, तरीदेखील आम्ही काही तोट्यातील योजनांचा प्रीमियम १० टक्क्यांनी किंवा त्यापेक्षाही ज्यादा दर वाढविण्यासाठी जीआयसी-री:पुनर्विमा कंपनीसोबत बोलणी करीत आहेत. न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अध्यक्ष जी. श्रीनिवासन यांनी सांगितले की, त्यांची कंपनी पुढील आर्थिक वर्षापासून अग्नि आणि गु्रप हेल्थ योजनांचा प्रीमियम वाढवू शकते. त्यांनी अपेक्षापेक्षाही कमी दरांमध्ये प्रीमियमचे दर असल्याची पुष्टी दिली.
खासगी क्षेत्रातील एस.बी.आय.चे मुख्य कार्यकारी पूषान महापात्रा यांनी सांगितले की, गुंतवणूक कमी झाल्याने होणारा फायदा हा कसा टिकवून ठेवायचा हे मोठे आव्हान आहे. यासाठी कंपनी विविध धोरणे आखत आहे. या कामांमध्ये कुशलता आणणे, खर्चामध्ये नियंत्रण आणणे आणि विम्याची जोखीमची निवड आणि मूल्य निर्धारणामध्ये सुधारणा करणे सामील आहे.