मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका, लोक नाराज आहेत; 'त्या' अहवालानं भाजपची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:48 IST2021-09-06T18:27:26+5:302021-09-06T18:48:31+5:30
अहवालानं भाजप, संघाचं टेन्शन वाढलं; भाजप नेतृत्त्वाकडून मंथन सुरू

मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका, लोक नाराज आहेत; 'त्या' अहवालानं भाजपची चिंता वाढली
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकार मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतरच निवडणूक घेईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षानंदेखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र बुद्धिजीवी वर्गानं दिलेल्या इशाऱ्यानं भाजपची चिंता वाढली आहे.
भाजपनं जम्मूच्या आर एस पुरामध्ये बुद्धिजिवींची बैठक बोलावली होती. त्यात झालेल्या मंथनानं भाजपची चिंता वाढली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे पक्षाविरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे, असं बुद्धिजिवींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. काश्मीर खोऱ्यात मोदी लाटेच्या जीवावर पुढे जाऊ नका, असंदेखील बुद्धिजिवींनी सांगितलं.
'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है', चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. जम्मू-काश्मीर संवेदनशील भाग असल्यानं भाजपनं आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालणार नाही असा बुद्धिजिवींचा अंदाज आहे. त्यांनी दिलेला अहवाल नुकताच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पोहोचला. त्यामुळे भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिंतादेखील वाढली आहे.
'मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाजा वाटत नाही'; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
जम्मू-काश्मीरमध्ये तगडा चेहरा शोधण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्त्वाकडून सुरू आहे. त्यासाठी भाजप इतर पक्षातील नाराजांवर नजर ठेवून आहे. 'जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत भाजपनं मोदी लाटेच्या भरवशावर राहू नये. कारण लोकांच्या मनात सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात नाराजी आहे,' असं बुद्धिजिवींना त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.