आंतरधर्मीय विवाह अवैध, हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नासाठी हिंदू असणे आवश्यक - सुप्रीम कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:50 AM2023-01-17T07:50:35+5:302023-01-17T07:50:51+5:30
धर्मांतर न करता हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींमधील विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध आहे का?
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : आंतरधर्मीय जोडप्यांमधील विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार रद्दबातल ठरतो. या कायद्यानुसार केवळ हिंदूच लग्न करू शकतात, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. २०१७ मध्ये तेलंगणातील एका हिंदू महिलेने तिच्या पतीविरुद्ध ४९४ आयपीसी प्रमाणे गुन्हा नोंदवला. ४९४ मध्ये पहिला जोडीदार असताना दुसरे लग्न केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
या प्रकरणात महिला हिंदू असून, आरोपी पती भारतीय-अमेरिकन ख्रिश्चन आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीने खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र ती फेटाळण्यात आली.
पुरुषाने दावा केला की, त्याने कधीही हिंदू धर्म स्वीकारला नाही. तक्रारदारासोबतचा कथित विवाह, समारंभाच्या आधी कधीही नोंदवला गेला नाही. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जोसेफ यांनी ‘लग्न अग्राह्य आहे’ अशी टिप्पणी केली. “हिंदू कायद्यांतर्गत फक्त हिंदूच विवाह करू शकतात,” असे म्हणत न्यायमूर्ती नागरथना यांनीही न्या. जोसेफ यांचे समर्थन केले. आता कोर्टाने हे प्रकरण फेब्रुवारीमध्ये अंतिम सुनावणीसाठी ठेवले आहे.
कायद्याचे प्रश्न
धर्मांतर न करता हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींमधील विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध आहे का?
विवाह अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह केला जाऊ शकतो का?