जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात; पुरावे समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 10:06 AM2018-09-23T10:06:27+5:302018-09-23T10:09:07+5:30
पाकिस्तानमधून दहशतवाद्यांकडून मिळालेले मेसेज सुरक्षा दलांकडून इंटरसेप्ट
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांना मिळाले आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या सूचनेवरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील तीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच भारतानं संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांची भेट घेणार होत्या. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर भारतानं ही भेट रद्द केली.
पाकिस्तानकडून येणारे मेसेज भारतीय सुरक्षा दलांनी इंटरसेप्ट केल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. मेसेज इंटरसेप्ट करण्यात आल्यानंतरच सरकारकडून न्यूयॉर्कमधील भेट रद्द करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी चौघांचं अपहरण केलं होतं. यामध्ये तीन पोलिसांचा समावेश होता. या तिन्ही पोलिसांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांची हत्या करण्याचे आदेश सीमेपलीकडून देण्यात आले होते, असा दावा भारतीय सुरक्षा दलांनी केला आहे. हे मेसेज भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इंटरसेप्ट केले आहेत. पाकिस्तानकडून येणारे मेसेज इतके स्पष्ट होते, की त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख होता.
सीमेपलीकडून आलेल्या मेसेजमधून तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय एका नागरिकाची सुटका करण्याचे आदेशदेखील दहशतवाद्यांना सीमेपलीकडून देण्यात आले. या संदेशांचा वेग अतिशय वेग अतिशय जास्त होता आणि यानंतर लगेचच दहशतवाद्यांकडून मेसेजमधून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे दहशतवाद्यांचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलांना पुरेसा वेळ मिळाला नाही. दहशतवाद्यांना हत्या केलेले एसपीओ निसार अहमद, फिरदोस अहमद आणि कुलवंत सिंह यांचे मृतदेह एका बागेत मिळाले. तर एका एसपीओचा भाऊ असलेल्या फयाज अहमद भटला दहशतवाद्यांनी सोडून दिलं.