व्याजदर पाव टक्क्यांनी घटले, गृहकर्जे, वाहन कर्जे स्वस्त होण्याचे संकेत
By admin | Published: October 4, 2016 02:58 PM2016-10-04T14:58:45+5:302016-10-04T14:58:45+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये म्हणजे रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये म्हणजे रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे. आता भारतीय बँकांना अल्पकालीन कर्जे 6.25 टक्के जराने रिझर्व्ह बँकेकडून मिळणार आहेत. याचा परिणाम एकूण व्याजदरांवर होण्याची शक्यता असून गृहकर्जे, वाहन कर्जे, वैयक्तिक कर्जे आदी कर्जे स्वस्त होण्याचे संकेत मिळाले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे हे पहिलेच पतधोरण असून त्यांनी केंद्र सरकारला अभिप्रेत असलेले व्याजदर सिथिल करण्याचे धोरण अंगीकारलेले दिसत आहे. आजच्या कपातीनंतर जाहीर झालेला 6.25 टक्के रेपो रेट हा सहा वर्षातला नीचांकी दर आहे.
पतनिर्धारण समितीच्या सहा सदस्यांनी व्याजदर कमी करण्यासाठी मत दिले. समितीने नजीकच्या काळामध्ये महागाईचा दर पाच टक्क्यांच्या आसपास ठेवण्याचे लक्ष्य ठेवले असून पाच टक्क्यांपेक्षा जास्त महागाई वाढणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर शेअर बाजारामध्ये अपेक्षेप्रमाणे सकारात्मक पडसाद उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक काल बंद होतानाच्या तुलनेत 117 अंकांनी वधारून 28,361 च्या आसपास घोटाळत होता.