उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपात दिग्गज इच्छुक
By admin | Published: February 20, 2017 01:14 AM2017-02-20T01:14:46+5:302017-02-20T01:14:46+5:30
जुलै-आॅगस्टमध्ये होत असलेल्या उप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, हुकूमदेव
व्यंकटेश केसरी / नवी दिल्ली
जुलै-आॅगस्टमध्ये होत असलेल्या उप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, हुकूमदेव नारायण यादव व लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नावाची चर्चा आहे.
लोकसभेत भाजपचे २८२ सदस्य आहेत. तर, राज्यसभेत ५६ सदस्य आहेत. आपले सहकारी पक्ष आणि जे पक्ष काँंग्रेससोबत जाऊ इच्छित नाहीत त्या पक्षांना भाजप सोबत घेऊ शकते. अर्थात, काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते सद्या या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावत आहेत. सदर प्रतिनिधीशी बोलताना या नेत्यांनी सांगितले की, सुमित्रा महाजन उप राष्ट्रपती होण्यासाठी इच्छुक आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नाही. कारण, अण्णाद्रमुक, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस यासारख्या पक्षांवर भाजप अवलंबून आहे. तामिळनाडूतील द्रमुक, जम्मू काश्मीरमधील पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांसारख्या पक्षांची आपआपल्या राज्यात चांगली ताकद आहे.
उप राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असलेले भाजपचे एक ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू हे राजस्थानातून राज्यसभा सदस्य आहेत. नायडू हे गुुरु एल. के. अडवाणी यांना सोडून आता नरेंद्र मोदी यांच्या गटात दाखल झालेले आहेत.
मोदींची पसंती कुणाला?
पंतप्रधान मोदी यांची पसंती मात्र बिहारच्या मधुबनी मतदारसंघातील खासदार हुकूमदेव नारायण यादव यांना आहे. यादव यांनी १९७७ मध्ये जनता पार्टीकडून प्रथम लोकसभेत प्रवेश मिळविला होता. लोकदलाच्या चिन्हावर नंतर ते संसदेत आले आणि त्यानंतर भाजपत स्थिर झाले. वाजपेयी सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्री होते. अर्थात यातील कोणत्या उमेदवाराला मोदी अंतिम पसंती देतील हे अस्पष्ट आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अतिशय छोटी असणार आहे. भैरवसिंह शेखावत हे भाजपचे पहिले उप राष्ट्रपती झाले होते.