आंतरधर्मीय विवाह शरियतला नाहीत मान्य, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:53 AM2021-08-07T07:53:11+5:302021-08-07T07:54:09+5:30
Interfaith marriages: आंतरधर्मीय विवाहांना शरियतने मान्यता दिलेली नाही, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी) सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह इस्लामच्या दृष्टीने अवैध ठरतात, असेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : आंतरधर्मीय विवाहांना शरियतने मान्यता दिलेली नाही, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी) सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह इस्लामच्या दृष्टीने अवैध ठरतात, असेही त्यांनी सांगितले.
मुस्लीम युवकांनी बिगरमुस्लीम मुलींशी विवाह करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे की, आई-वडील, मशीद, मदरशांमधील मौलवी यांनी आंतरधर्मीय विवाह रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. आंतरधर्मीय विवाहांना सामाजिक विचारसरणी व संकेतांनुसार मान्यता मिळाली असेल; पण इस्लामला असे विवाह मान्य नाहीत. एकाच ठिकाणी काम करत असताना मने जुळल्याने व पुरेशा धार्मिक शिक्षणाच्या अभावी सध्या आंतरधर्मीय विवाह मोठ्या प्रमाणावर होत आहेत; मात्र बिगरमुस्लीम मुलाबरोबर लग्न झालेल्या मुस्लीम मुलीला पुढील काळात खूप अडचणींना तोंड द्यावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही मुलींना आपले प्राण गमवावे लागले, असेही या बोर्डाने सांगितले.
देशात लव्ह जिहाद सुरू असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. उत्तर प्रदेशासह काही राज्यांत आंतरधर्मीय विवाहांवरून मध्यंतरी वादळ उठले होते. असे काही विवाह रोखण्याचेही प्रकार घडले होते; मात्र त्या घटनांचा उल्लेख न करता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आपली मते व्यक्त केली आहेत.
पाल्यांच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेवा
n मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सांगितले की, आंतरधर्मीय विवाह रोखण्यासाठी सात सूत्रांचे पालन करणे आवश्यक आहे.
n आई-वडिलांनी आपला पाल्य मोबाइलचा गैरवापर तर करत नाही ना, यावर लक्ष ठेवावे.
n मुले-मुली एकत्र शिकतात, अशा शाळांमध्ये आपल्या पाल्याला घालू नये. आंतरधर्मीय विवाह करू नका, असा उपदेश मशिदीतील इमामांनी मुस्लीम समुदायाला दर शुक्रवारी करावा, आदी गोष्टींचा सात सूत्रांमध्ये समावेश आहे.