Article 370: काश्मीर खरंच शांत? संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून वेगळेचं सत्य समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 03:49 PM2019-10-10T15:49:58+5:302019-10-10T15:51:22+5:30
कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर शांत असल्याचा सरकारचा दावा
नवी दिल्ली: कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला. अद्यापही सरकार आपल्या दाव्यावर ठाम आहे. मात्र संरक्षण दलांकडे असणाऱ्या कागदपत्रांमधून वेगळेची माहिती समोर आली आहे. कलम ३७० काढून टाकण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्याची आकडेवारी संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. 'न्यूज१८'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये संसदेनं घेतला. या ऐतिहासिक निर्णयाला दोन महिने झाले आहेत. या कालावधीत काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्या आहेत. म्हणजेच काश्मीरात प्रत्येक दिवशी सरासरी पाच दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये सुरक्षा दलांचे जवळपास १०० जवान जखमी झाले. यापैकी ८९ जवान निमलष्करी दलाचे आहेत.
काश्मीरमधील बहुतांश भागात शांतता असल्याचा दावा जम्मू काश्मीर प्रशासनानं केला. २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. त्यानंतर काश्मीर पेटलं होतं. त्या तुलनेत सध्याची काश्मीरमधील स्थिती अतिशय चांगली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यात दगडफेकीच्या केवळ ४० घटना घडल्या होत्या, असंदेखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
६ ऑगस्टला संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी काश्मीरमधील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय होताच काश्मीरमधील अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काश्मीरमधील फोन आणि इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली. याशिवाय जवळपास ४ हजार लोकांना ताब्यात घेण्यात आलं. काश्मीरमधील अनेक प्रमुख नेत्यांना या काळात नजरकैदेत ठेवण्यात आलं.