कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 08:17 PM2018-10-03T20:17:30+5:302018-10-03T20:40:11+5:30
18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत अंतिम सुनावणी होणार
नवी दिल्ली: भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावरील हेरगिरीच्या आरोपावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी होणार आहे. 18 ते 21 फेब्रुवारी 2019 या कालावधीत हेगमध्ये ही सुनावणी होईल. कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप केला आहे. त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे.
पुढील वर्षी 18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी होईल. 18 फेब्रुवारीला सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान भारताला आपली बाजू मांडावी लागेल. तर 19 फेब्रुवारीला याच वेळेत पाकिस्तानला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. यानंतर 20 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 4.30 या कालावधीत भारताकडून, तर 21 फेब्रुवारीला याच वेळेत पाकिस्तानकडून आपापली बाजू मांडण्यात येईल. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय न्यायालयात दोन्ही देशांना दोन वेळा स्वत:ची बाजू मांडावी लागेल.
International Court of Justice to hold public hearing in Kulbhushan Jadhav case from 18 February to 21 February 2019. pic.twitter.com/QREVXphR97
— ANI (@ANI) October 3, 2018
मे महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यासाठी भारतानं न्यायालयाला विनंती केली होती. यावेळी वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी न्यायालयात भारताची बाजू मांडली होती. तर खावर कुरेशी यांनी पाकिस्तानतर्फे युक्तीवाद केला होता. भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप ठेवला आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपकादेखील पाकिस्तानकडून त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयाला भारतानं मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं.