आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन : महाराष्ट्रातील २ व्यक्ती व ३ संस्थांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:26 AM2017-12-04T02:26:25+5:302017-12-04T02:26:25+5:30
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांमधील उल्लेखनीय
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांमधील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती, दिव्यांगांना मदत करणा-या संस्था, याखेरीज संशोधन संस्था, उत्कृष्ट दिव्यांगजन कर्मचारी अशा १४ विविध श्रेणींत राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात मुंबई येथील प्रणय बुरडे, पुणे येथील गौरी गाडगीळ यांच्यासह, नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लाइंड (नॅब), जळगाव पीपल्स को-आॅप बँक, नवी मुंबई महानगर पालिका अशा २ व्यक्ती व ३ संस्थांचा समावेश आहे. जन्मत:च डाउन सिंड्रोम आजाराने ग्रस्त प्रणय बुरडे यांनी दिव्यांगतेवर मात करीत स्वबळावर रोजगार मिळविला.
डाउन सिंड्रोम आजारावर मात करीत पुण्याच्या गौरी गाडगीळने दिव्यांगांसाठीच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताला दोनदा रजत व दोनदा कांस्य पदक मिळवून दिले व तमाम दिव्यांगांसाठी आदर्श वस्तुपाठ निर्माण केला. गौरीच्या यशोगाथेवर ‘यलो’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित झालाय.
दिव्यांगांसाठी कार्यरत देशातल्या सर्वोत्तम संस्थांमध्ये दोन संस्थांची निवड झाली. त्यात पहिला क्रमांक नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील ‘ईटीसी’ या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणा-या केंद्रास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा उपक्रम राबविणाºया नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामस्वामींनी हा पुरस्कार स्वीकारला. दिव्यांगांसाठी विशेषत: अंधांसाठी ब्रेल लिपीत पुस्तके प्रकाशित करणा-या ब्रेल प्रेसचा एकमेव राष्ट्रीय पुरस्कार, मुंबईतल्या वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) संस्थेला प्रदान करण्यात आला. दिव्यांगांसाठी संगणकावर सुलभ संकेतस्थळ निर्माण केल्याबद्दल उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार, दी जळगाव पीपल्स को-आॅप बँकेला प्रदान करण्यात आला.