गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा दोन मराठी चित्रपट, ८ लघुपटांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 01:59 PM2018-11-01T13:59:09+5:302018-11-01T14:00:20+5:30
गोव्यात २0 नोव्हेंबरपासून ४९ वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव होत आहे.
नवी दिल्ली : गोव्यात २0 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा २ मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक ८ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. विविध भाषेतील एकूण २२ चित्रपट आणि २१ लघुपट या विभागात दाखविण्यात येणार आहेत.
इंडियन पॅनोरमा विभागात पुण्याच्या निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पा आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघी हे दोन मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
दिग्दर्शक शाही एन करुन यांच्या ओएलयू या मल्याळम चित्रपटाने इंडियन पॅनोरामाची सुरुवात होणार आहे. या विभागात मुख्य प्रवाहातील पद्मावत, टायगर जिंदा है, राजीसह सूजित सरकारचा आॅक्टोबर व कामाख्य नारायण सिंगचा भोर हे हिंदी चित्रपट दाखविण्यात येत आहेत. नागाश्विनचा गाजलेला महानटी हा तेलगू चित्रपटही या विभागात दाखविण्यात येणार आहे. याशिवाय पाच बंगाली, सहा मल्याळी, चार तमिळ, एक तेलगू, एक तुलू, एक लद्दाखी, एक जस्सारी भाषेतील चित्रपटांचाही समावेश आहे.
लघुपटांसाठी चक्क ८ मराठी भाषेतील लघुपट निवडण्यात आले आहेत. याचा प्रारंभही आदित्य जांभळे दिग्दर्शित खरवस या मराठी लघुपटानेच होणार आहे. याशिवाय कोल्हापूरच्या मेधप्रणव बाबासाहेब पोवार यांचा हॅपी बर्थ डे, नितेश पाटणकरांचा ना बोले वो हराम, प्रसन्ना पोंडेंचा सायलेंट स्क्रीम, सुहास जहागिरदार यांचा येस आय अॅम माऊली, शेखर रणखांबे यांचा पॅम्पलेट, गौतम वझे यांचा आई शपथ, आणि स्वप्नील कपुरे यांचा भर दुपारी या लघुपटांचा या विभागात दाखविण्यात येणार आहेत.
लघुपटांमध्येही चार इंग्लिश, तीन हिंदी, तीन मल्याळी, एक बंगाली, एक भोजपुरी आणि एक उरिया भाषेतील लघुपट दाखविण्यात येणार आहेत. चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार राहुल रवैल यांच्या अध्यक्षेतखालील १३ सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी या महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमा विभागासाठी एकूण २२ चित्रपटांची निवड केली आहे, तर २१ लघुपटांचा समावेश करण्यात आला आहे.