International Flights Resume India: देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरु होणार; कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या सावटाखाली निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 07:13 PM2021-11-26T19:13:16+5:302021-11-26T19:22:22+5:30
India will start International Flights: गेल्या वर्षी 23 मार्चला आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही देशांसोबत एअर बबल पॅक्ट तयार करण्यात आले आणि काही प्रमाणावर विमान सेवा सुरु करण्यात आली होती.
कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरु केली जाणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा करून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.
गेल्या वर्षी 23 मार्चला आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही देशांसोबत एअर बबल पॅक्ट तयार करण्यात आले आणि काही प्रमाणावर विमान सेवा सुरु करण्यात आली होती. सध्या भारताचा अशा 28 देशांसोबत एअर बबल पॅक्ट आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, युएई, केनिया, भूतान आणि फ्रान्स सारखे देश आहेत. या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे सुरु आहेत.
एअर बबल करारांतर्गत, दोन देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ निवडक एअरलाइन्सद्वारे चालविली जातात. तेथे प्रवास करण्यासाठी अनेक कठोर निर्बंध देखील आहेत. तथापि, नुकतेच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले होते की सरकार आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्य करू इच्छित आहे. यानुसार आज निर्णय जाहीर करण्यात आला. आता कोरोनापूर्व परिस्थितीसारखी विमानसेवा सामान्य होणार आहे.
29 नोव्हेंबरपासून सिंगापूर फ्लाइट
या महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि सिंगापूर दरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावर सहमती झाली होती. या अंतर्गत, ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे ते आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील आणि त्यांना क्वारंटाईनचे पालन देखील करावे लागणार नाही. भारत आणि सिंगापूर दरम्यान 29 नोव्हेंबरपासून उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. विस्तारानेही याबाबत घोषणा केली आहे.
14 देश वगळणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यापासून भारत प्रतिबंधित १४ देश वगळता नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करेल. तथापि, या 14 देशांसह सध्याची एअर-बबल फ्लाइट व्यवस्था सुरूच राहील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या १४ देशांसाठी फ्लाइट्सवर बंदी कायम राहणार आहे त्यात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.