भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू, रविवारी विमानांनी उड्डाण घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:16 AM2022-03-28T06:16:05+5:302022-03-28T06:16:48+5:30
रविवारपासून उन्हाळ्यासाठी देशांतर्गत नवीन १३५ आणि १५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : तब्बल दोन वर्षांनंतर रविवारपासून भारतातून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली आहे, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. कोविड-१९ ची सर्वव्यापी साथ आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी अनेक विमानांनी उड्डाण घेतले.
रविवारपासून उन्हाळ्यासाठी देशांतर्गत नवीन १३५ आणि १५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. रविवारपासून गोरखपूर-वाराणसीदरम्यान विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ग्वाल्हेरमधून व्हर्च्युअल माध्यमातून ही विमानसेवा सुरू केली, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
भारतीय लोक विदेशात जाण्यासाठी आणि विदेशी लोक भारतात येण्यासाठी इच्छुक असल्याने रविवारपासून पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरू करण्यात आली आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.