आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 09:43 AM2020-11-27T09:43:07+5:302020-11-27T09:43:37+5:30
Corona Virus: काेराेना रुग्णसंख्या वाढल्याने डीजीसीएचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने भारतात आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए) कार्यालयाने याबाबत एक परिपत्रक काढून माहिती दिली.
भारतात काेराेनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली हाेती. अनलाॅकनंतरही स्थगिती उठविली नव्हती. युराेपमध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही ठरावीक मार्गावर निवडक उड्डाणांना परवानगी देण्यात येऊ शकते, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.
कार्गाेसेवा, वंदे भारत माेहिमेला वगळले
n या निर्बंधातून कार्गाेसेवा, वंदे भारत माेहीम आणि विशेष विमानांना वगळण्यात आले आहे. भारताने अमेरिका आणि इंग्लंडसह २० देशांसाेबत ‘एअर बबल’ करार केला आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यापासून विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, तर देशांतर्गत विमानसेवेला २५ मेपासून परवानगी देण्यात आली आहे. ऑक्टाेबरच्या सुरुवातीला भारतात काेराेनाचा संसर्ग नियंत्रणात आला हाेता. परंतु, दिवाळीनंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ हाेत आहे.