नोबेलमुळे बालहक्क आंदोलनाला आंतरराष्ट्रीय मान्यता
By Admin | Published: January 16, 2015 04:49 AM2015-01-16T04:49:25+5:302015-01-16T04:49:25+5:30
भारतात जन्मलेल्या कोणत्याही भारतीयाला पहिल्यांदाच शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळणे हा भारतीय मूल्य आणि परंपरेचा सन्मान आहे.
शांततेसाठी मिळालेल्या २०१४ च्या नोबेल पुरस्काराकडे आपण कसे पाहता?
- भारतात जन्मलेल्या कोणत्याही भारतीयाला पहिल्यांदाच शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळणे हा भारतीय मूल्य आणि परंपरेचा सन्मान आहे. जगभरातील सर्वाधिक शोषित, वंचित आणि उपेक्षित मुलांना त्यांच्या समस्या आणि दु:खाला एवढी मोठी जागतिक ओळख मिळाली आहे. याआधी कोणत्याही बालहक्क कार्यकर्त्याला हा सन्मान मिळालेला नाही. त्याचे श्रेय माझे एकट्याचे नाही. म्हणूनच पुरस्काराची रक्कम मला स्वत:वर किंवा माझ्या संघटनेवर खर्च करायची नाही. मी ती रक्कम पुरस्कार स्वीकारताच जिनेव्हामध्येच सोडली असून त्याच ठिकाणाहून ही रक्कम बाल अधिकारासाठी लढणाऱ्या जगभरातील गरजू संघटनांसाठी खर्च केली जाईल. मी केवळ नोबेलचे पदक घेऊन भारतात परत आलो आहे.
आपण ते पदकही राष्ट्रपती भवनाला दिले आहे !
-होय, कारण हे पदकही माझे नाही असे मी मानतो. माझ्या माहितीप्रमाणे पाहता येईल असे एकही नोबेल पदक देशात नाही. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे पदक विश्वभारतीमधून चोरी गेले आहे. मी हे पदक देशवासीयांना सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राष्ट्रपती भवनात वेगळी जागा लागलेली नाही. ते मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सुपूर्द केले आहे. खरे तर ते राजशिष्टाचाराविरुद्ध (प्रोटॉकॉल)होते. कारण राष्ट्रपती पदक आणि पुरस्कार इतरांना प्रदान करीत असतात. त्यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी ते राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात ठेवण्याचा निर्णय घेतला. आता तुमच्या प्रमाणेच मीही ते पाहू शकतो, पण त्याला स्पर्श करू शकत नाही.
पुरस्कार तुम्हाला मिळाला मात्र तुमचे गृहराज्य असलेल्या मध्य प्रदेशचे नेते, आमदार एवढेच नव्हे तर मंत्र्यांनीही ज्येष्ठ मंत्री कैलाश विजय वर्गीय यांना शुभेच्छा संदेश पाठविले, याला काय म्हणायचे?
- यावर मी काय बोलणार. स्वत:च शुभेच्छा घेत आहात आणि देत आहात हे चांगलेच आहे. सर्व खासदार, आमदार, मंत्री आणि सर्वसामान्य लोक हा पुरस्कार आपलाच आहे, असे मानू शकतात. सोबतच या सर्वांनी बालगुलामगिरीविरुद्ध आणि बाल अधिकारासाठी लढ्यात सहभागी होण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी.
नोबेलच्या पुढे काय?
- बघा, नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर जगभरातील बाल अधिकारांबाबत खूप मोठा बदल दृष्टिपथात आला आहे. काही तासातच बाल गुलामगिरी, मुुलांचे शोषण, बालमजुरी, शिक्षण यासारख्या मुद्यांवर व्यापक चर्चा सुरू झालेली आहे. संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करूनही ते मला शक्य झाले नसते. बाल अधिकारांच्या लढ्यात चैतन्य पसरले आहे. मला भाषणांसाठी जगभरातून ११ हजारांवर निमंत्रणे आली आहेत. आज बाल गुन्हेगारी आणि बाल अधिकार हा अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा बनला असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांना कोणती कृतियोजना सादर केली काय?
- नोबेल मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींशी झालेली चर्चा शिष्टाचाराचा भाग होती. संपन्न, स्वच्छ भारतासोबतच बालमित्र भारत बनविण्याचा विचार मी बोलून दाखविला. पंतप्रधान खूप उत्साहित वाटले. भविष्यातही आम्ही ठोस कृतियोजनेसह पुन्हा भेटू. मी त्यांना सांगितले की, खासदार आदर्श ग्राम हे बाल मित्र बनत नाही तोपर्यंत ते आदर्श गाव ठरणार नाही. आम्ही शेकडो बालमित्र गावे बनविली आहेत. अशा गावांमध्ये सर्व मुले बाल शोषण, बालविवाहापासून मुक्त असतात. सर्व जाती- धर्माची मुले विशेषत: मुली शाळेत जातात आणि शिक्षण घेतात. बालमित्र गावांमध्ये सर्व मुले एकत्र येऊन बाल पंचायतीची निवड करतात. या मुलांमध्ये लोकशाही मूल्यांचे प्रशिक्षण सुरू झालेले असते. ग्राम पंचायतींच्या बैठकींमध्ये बालमित्र पंचायतीचे प्रतिनिधीही सहभागी होतात. बालपण केंद्रित ग्रामीण विकासाची धारणा खासदार आदर्श गावाचा भाग बनायला हवी. पंतप्रधान म्हणाले, प्रस्ताव खूप चांगला आहे. त्यावर पुढेही आम्ही चर्चा करू.
आपण बालमजुरी रोखण्यासाठी कायदा आणण्याची बाब बोलून दाखविली होती. सर्व खासदारांना त्याबाबत पत्रही पाठविले होते, त्याचे काय झाले?
- बालमजुरी रोखण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती विधेयक प्रलंबित आहे. सध्याचा कायदा खूप जुना आहे. १९८६ च्या कायद्यानुसार १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना केवळ धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे. उर्वरित स्थळी ते काम करू शकतात. दुसरीकडे शिक्षणाच्या अधिकारानुसार १४ व्या वर्षांपर्यंत मुले शाळेतच असायला हवी. यातून विसंगती स्पष्ट दिसते. १४ वर्षांपर्यंत एखादा मुलगा काम करणार असेल तो शाळेत कसा जाणार? याआधीच्या सरकारने तात्त्विक स्वरुपात हे मान्य केले होते. मात्र नंतर लोकसभा निवडणूक आली आणि नवे सरकार स्थापन झाले. गेल्या सरकारने किंवा आताच्या सरकारने शोषित आणि पीडित मुलांच्या कल्याणाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मी सर्व खासदारांना १४ वर्षांपर्यंत सर्व प्रकारच्या बालमजुरीवर प्रतिबंध आणण्याची मागणी केली होती. १८ वर्षांपर्यंत धोकादायक उद्योगातील मजुरी, बालवेश्या, बालगुन्हेगारी रोखणारा कायदा आणण्याचे आवाहन केले होते. बालमजुरीतून मुक्त करण्यात आलेल्या बालकांचे पुनर्वसनाची तरतूदही त्यात असावी. बहुतांश खासदारांना ही कल्पना आवडली. तथापि त्यासंबंधी कोणतेही विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आलेले नाही.
सरकारी नोकरी, आर्य समाज, समाजवादी आंदोलन, वेठबिगारी मुक्ती ते ‘बचपन बचाओ ’ आंदोलनापर्यंतच्या दीर्घ प्रवासाबद्दल काय सांगणार?
- मी सध्या कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य अथवा कार्यकर्ता नाही. युवावस्थेत डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रभावित झालो. विशेष म्हणजे लोहिया यांच्या इंग्रजी हटाओ आंदोलनाशी मीही जोडला गेलो होतो. विद्यार्थीदशेत आर्य समाजाशी जुळलो होतो. स्वामी दयानंदांनी प्रभावित केले होते. हिंदू समाजात जातीच्या नावावर अवडंबर होते. मृतांचे भोजन, श्राद्ध कर्माविरुद्ध आर्य समाजाच्या आंदोलनाकडे ओढल्या गेलो. स्वामी विवेकानंदांचा माझ्यावर प्रभाव होता. आजही आहे. १९८१ मध्ये दिल्लीत आल्यानंतर स्वामी अग्निवेश यांच्यासोबत वेठबिगार मुक्तीच्या बॅनरखाली ‘बंधुआ मुक्ती’ आंदोलन छेडले. तेव्हा आढळून आले की, बोलू न शकणाऱ्या चिमुकल्या मुलांची गुलामी अधिक अमानुष आहे. त्यातून बचपन बचाओ आंदोलनावर लक्ष केंद्रित केले. सध्या १४० देशांमध्ये आमचे काम सुरू आहे.
कैलाश शर्मा ते कैलाश सत्यार्थी कधी आणि कसे बनले?
-१९६९ मध्ये मी १५ वर्षांचा असताना महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात होते. पुस्तकांच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या विचारांचा परिचय झाला होता व त्याचा प्रभावही होताच. असे वाटत असायचे की, हे लोक समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तीसाठी आपले पूर्ण आयुष्य वाहून देतात. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्हीही असे काम करण्याचे योजले.
आम्ही मध्य प्रदेशातील विदिशा येथे दलित आणि डोक्यावरून मैल वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत सामूहिक भोजन आयोजित केले होते. सर्व नेत्यांनी त्यासाठी होकार दिला होता. विदिशाच्या गांधी उद्यानात खिचडी तयार करण्यात आली मात्र रात्री जेवणासाठी कोणताही नेता फिरकला नाही. मी घरी परतलो तेव्हा माझ्या घरी पंडित, पुरोहितांसह दहा- बारा जण उभे ठाकले होते. कैलाशमुळे संपूर्ण शहराची बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केला. थोरले बंधू नाराज होते. आई रडत होती. भाऊ म्हणत होते तुला जातीबाहेर काढतील. कैलाशने घरी परतण्याऐवजी हरिद्वारला जाऊन गंगा नदीत स्नान करावे. त्यानंतर १०१ ब्राह्मणांना भोजन द्यावे, असे फर्मान सोडण्यात आले. मी त्याला नकार दिला. सफाई करणारे घाणेरडे कसे, असा माझा सवाल होता. त्यानंतर त्यांनी सर्व रोष माझ्यावर काढत मला घर आणि जातीतून बाहेर काढले. हे लोक मला जातीतून काय बाहेर काढणार? मीच जातीच्या बंधनातून बाहेर पडतो. त्याचवेळी मी शर्मा हे नाव हटविले. अनेक दिवस माझे नाव कैलाश एवढेच होते. दरम्यान मी काही लेख सत्यार्थी या नावाने लिहिले आणि माझ्या नावामागे ‘सत्यार्थी’ लागले.
आंदोलनाच्यावेळी तुमच्यावर प्राणघातक हल्ले झाले?
- मी ३५ वर्षांपूर्वी काम सुरू केले. त्याकाळी बालमजुरी ही समस्या संपूर्ण जगासमोर कशी आणावी हे एक मोठे आव्हान होते. सामाजिक दुष्टावा किंवा गुन्हेगारी सिद्ध करणे मोठे कठीण काम होते, कारण त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही कायदा नव्हता. आम्ही ते आव्हान स्वीकारले. किंमतही चुकविली. या आंदोलनात माझे दोन सहकारी शहीद झाले. माझ्यावरही अनेकदा प्राणघातक हल्ले झाले. माझा डावा पाय मोडला. उजवा खांदा तुटला. डोक्याला गंभीर दुखापती झाल्या. अनेकदा मरता मरता वाचलो. मला आठवते की, २००४ च्या जून महिन्यात उत्तर प्रदेशातील कर्नेलगंज (गोंडा) येथे ग्रेट रोमन सर्कशीत नाचणाऱ्या आणि लैंगिक छळवणुकीच्या शिकार बनलेल्या नेपाळी मुलींना मुक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्थानिक अधिकाऱ्यांना घेऊन पोहोचलो तेव्हा सर्कशीच्या मालकाने लोखंडी रॉड आणि क्रिकेटच्या बॅटने मारले. आम्ही रक्तबंबाळ झालो पण हार मानली नाही. तेथेच आमरण उपोषण सुरू केले. अखेर या मुलींची सुटका झाली. शारीरिक हल्ल्यांपेक्षाही चारित्र्यहननाचा प्रयत्न अधिक घातक असतो. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आमचे मनसुबे आणखी मजबूत झाले.
देशात गरिबी आणि बेरोजगारी असताना बालमजुरी कशी थांबविणार?
- गरीब मुले मजुरी करीत राहतील तर शिक्षण आणि प्रगतीच्या अन्य संधींपासून वंचित राहतील. देशात किमान सहा कोटी बालमजूर आहेत. तर दुसरीकडे साडेसहा कोटी वयस्क लोक बेरोजगार आहेत. मुलांना स्वस्त किंवा मोफत राबविता येत असल्याने मालक त्यांनाच अधिक पसंती देतात. ही स्थिती केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात आहे. जगात २१ कोटी बालमजूर आहेत. तर २० कोटींपेक्षा जास्त लोक बेरोजगार आहेत. बालमजुरी आणि गरिबी यांचे नाते कोंबडी आणि अंडे याप्रमाणे आहे. बालमजुरीचे कारण गरिबी तर गरिबीच्या कारणानेच अशी मजुरी चालत आहे. बालमजुरी संपविल्याखेरीज गरिबी संपणार नाही. बालमजुरी, गरिबी आणि अशिक्षितपणा यांचे त्रिकोणी नाते आहे.
बालमजुरीचे कारण काय असू शकते?
उत्तर-सर्वात मोठे कारण बालपणाबद्दल प्रतिष्ठा आणि सन्मानाचा अभाव हेच आहे. दुसरे कारण पुरेशा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचे आहे. त्यामुळेच आपल्या देशात बालमजुरी रोखण्यासाठी चांगले आणि कठोर कायदे बनू शकले नाहीत. जो कायदा आहे त्याचे योग्य पद्धतीने पालन झालेले नाही.
यंदासाठी कोणता संकल्प सोडला आहे?
- नववर्षासाठी कोणताही नवा संकल्प नाही. मुलांना शांतता आणि सुरक्षेच्या वातावरणात राहता यावे यासाठी यावर्षी आम्ही मुलांकरिता समाज हिंसामुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.